पुरंदरच्या गरजू विद्यार्थ्यांना “स्व चंदूकाका जगताप शैक्षणिक शिष्यवृत्ती” चा दहा लाखांचा लाभ…. ग्रामीण संस्थेचा उपक्रम…..
सासवड , दि.२८( प्रतिनिधी ) :-
पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते, शिक्षणमहर्षी स्व चंदूकाका जगताप यांच्या नावाने ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून “स्व चंदूकाका जगताप शैक्षणिक शिष्यवृत्ती” या योजनेअंतर्गत पुरंदर हवेलीतील ५६ गावांतील १६३ गरजू विद्यार्थ्यांना १० लाख ५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्ती वाटपाचा शुभारंभ सोमवारी ( दि २६ ) आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. स्व चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या संस्था ज्या पद्धतीने अविरत सुरू आहेत त्याच पद्धतीने ही शिष्यवृत्ती योजना सुरू राहणार असल्याचे अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करत सुशिक्षित व सुसंस्कृत युवा पिढी निर्माण करण्याचा ग्रामीण संस्थेचा निश्चय असल्याचे अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी सांगितले. सासवड नगरपरिषदेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या योजनेतून तालुक्यातील ५६ गावांतील १६३ प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षांतील फी प्रमाणे आठ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रा डॉ एम एस जाधव यांनी मनोगतातून
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्ट, चिकाटी, प्रामाणिकपणा अंगी बाळगण्याबाबत सांगितले. ग्रामीण
संस्थेचे संचालक डॉ सुमीत काकडे, समन्वयक किशोरी पवार यांनी ग्रामीण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
ग्रामीण संस्था सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून या संस्थेमार्फत महिलांना आरोग्य कार्ड, आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच कोरोना काळात कोविड केअर सेंटर, आनंदी थाळी, लसीकरण आदी अनेक उपक्रम राबवून संस्था समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आधार देत असल्याचे डॉ काकडे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या योजनेत बद्दल ग्रामीण संस्था, आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांचे आभार मानले. यावेळी ग्रामिण संस्थेच्या भारती गायकवाड, मुन्ना शिंदे तसेच प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्य ईस्माईल सय्यद, मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, उत्तम निगडे, शैलजा कोंडे, प्रल्हाद पवार, पांडूरंग पाटील, अनिल गद्रे, रेणुकासिंग मर्चंट, सरीता कपूर, एम एस जगताप यांसह पुरंदर तालुक्यातील विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
प्रा डॉ एम एस जाधव, रवींद्रपंत जगताप, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, महेश राऊत, अनिकेत भगत, विवेक जगताप, सुरज गदादे, हर्षदा पवार, दीपराज मेमाणे, आदित्य होले आदी या उपक्रमाचे संयोजन केले. महेश राऊत यांनी सुत्रसंचलन केले.
स्व चंदूकाकां प्रमाणेच कुटुंबीयांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय
स्व चंदुकाका जगताप यांना आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे आपल्या प्रमाणे समाजातील गरजू विद्यार्थ्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून पुरंदर – हवेलीसह परीसरातील तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील मुलांमुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवत मुलांना साक्षर आणि सक्षम केले. त्यांच्या या कार्याचा आणि विचारांचा वसा आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप व कुटुंबीय पुढे घेऊन जात आहेत. या कुटुंबाचे हे सामाजिक काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन सीए डॉ एम एस जाधव यांनी केले. याचाच एक भाग म्हणून पुरंदर – हवेलीतील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीसाठी ग्रामीण संस्थेच्या वतीने ” चंदूकाका जगताप शैक्षणिक शिष्यवृत्ती २०२२” या उपक्रमाची सुरुवात केल्याचे डॉ एम एस जाधव यांनी सांगितले