पुरंदरचे विमानतळ पुन्हा “एक्शन मोड” मध्ये, पहिल्याच जागेवर होणार विमानतळ
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्वी ठरलेल्या जागेवरच होणार अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुणे शहरातील नवीन इमारतीचे भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विमानतळाच्या सर्व परवानग्या या जुन्या जागेवरच्याच आहेत. त्यामुळे या विमानतळाची जागा बदलली जाणार नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली
या विमानतळासाठी आवश्यक असलेली जागा संपादन करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एका खासगी कंपनीकडून एक प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. हा प्रस्ताव सादर केलेल्या खासगी कंपनीचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही.
विमानतळाची भूसंपादन अधिसूचना लवकरच;
मोबदल्याचे पर्यायही निश्चित होण्याच्या मार्गावर
पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी भूसंपादनापोटी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे पर्याय निश्चित करण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.