पारगाव – माळशिरस नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ५९ कोटी २२ लाखांचा निधी… आमदार संजय जगताप यांची माहिती

सासवड, दि.२ ( प्रतिनिधी ) :-
पुरंदर तालुक्यातील पुर्व भागातील हजारो नागरीकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या, पारगाव – माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील गावांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नवीन योजना करण्यात येत आहेत. यामध्ये नायगाव, पारगाव, सिंगापूर, गु-होळी, राजेवाडी, वाघापूर, पिसर्वे, मावडी, राजुरी, माळशिरस, टेकवडी, आंबळे, रिसे आणि पिसे गावठाण आणि वाड्या वस्त्यांवरील नागरीकांसाठी नव्याने करण्यात येत असलेल्या या योजनांसाठी ५९ कोटी २२ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली. यामुळे आता या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सध्याची पारगाव – माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकित वीजबिल, देखभाल दुरुस्ती आणि वारंवार होणाऱ्या गळतीमुळे बंद आहे. या योजनेवरील गावांच्या सरपंच संघटनेकडून ही योजना चालविली जात होती. जिल्हा परिषदेने सदर योजना चालविण्याची वारंवार मागणी केली जात होती. नव्याने होत असलेल्या सदर योजनेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय तांत्रिक मंजुरी दिल्याचा शासन निर्णय ५ आॅगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये दरडोई दरदिवशी ५५ लिटर पाणी देण्यात येणार असल्याची तरतूद असून योजना पूर्ण झाल्यावर १ वर्षे योजना चालविण्याची जबाबदारी ठेकेदारावर असल्याचे शासन निर्णयात नमुद केले आहे. मात्र पाणीपट्टी वसूल करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक असून ही वसूल रक्कम योजना चालविणाऱ्या संस्थेला देण्याबाबत सुचना शासनाने दिल्या आहेत. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे.
नाझरे धरणातून ही योजना होणार असून या नवीन योजनेत नायगाव, पारगाव, सिंगापूर, गु-होळी, राजेवाडी, वाघापूर, पिसर्वे, मावडी, राजुरी, माळशिरस, टेकवडी, आंबळे, रिसे आणि पिसे गावठाण, वाड्या वस्त्यांसाठी होत असलेल्या या योजनेत स्वतंत्र विहिर, पंपगृह, सध्याच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती, पाण्याच्या टाक्या, २ लाख ४५ हजार मिटर लांबीची जलवाहिनी, सौर ऊर्जा प्रकल्प व पंपिंग मशिनरींचा समावेश आहे. योजनेच्या देखभाल दुरुस्ती करता योजनेच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीने ठेवणे आवश्यक असून सदर रक्कम जमा करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासन जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व गावांतील प्रत्येक घरात नळाने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पेयजल पुरवठा करण्याचे निश्चित केले. गावठाण, वाड्या वस्त्यांसाठी स्वतंत्र पाझर विहिर, नवीन पंपगृह, स्वतंत्र साठवण टाक्या व पंपिंग मशिनरींचा समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून या नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यातील आधिच्या योजना थकित पाणीपट्टी, वीजबील तसेच जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने तसेच पाण्याच्या अपू-या उद्भवामुळे बंद झाल्याने नवीन योजना करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page