पवारांचा नाद नाही करायचा…! पिचड पितापुत्राला आला अनुभव, ४० वर्षांची सत्ता खालसा…

महाराष्ट्र राज्य आणि नगरच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे १९९० च्या दशकापासूनचे अत्यंत विश्वासू सहकारी, खंदे समर्थक म्हणून पिचडांकडे पाहिलं जायचं.

पिचड राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्यही होते. २००९ मध्ये शरद पवारांनी त्यांना अगदी प्रदेशाध्यक्षपदही देऊ केले.

परंतु २०१९ च्या ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. त्यानंतर त्यांना सातत्याने धक्क्यावर धक्के बसतं गेले अन् आज जाहीर झालेल्या अगस्ती कारखाना निवडणूक निकालानंतर पिचड यांचं नाव राज्याच्याच काय तर अगदी स्थानिक राजकारणातूनही गायब झाल्यात जमा आहे.

अगस्ती साखर कारखान्यात पिचड पिता पुत्रांचा पराभव

आज जाहीर झालेल्या अगस्ती कारखान्याच्या निकालात मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांना पराभवाचा धक्का बसला आहे. इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटातून शेतकरी विकास मंडळचे उमेदवार वैभव पिचड यांच्यासह कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालक भाऊसाहेब खरात व अपक्ष उमेदवार प्रकाश हासे यांचा पराभव झाला आहे. या निकालानंतर पिचड यांची जवळपास २८ वर्षांची सत्ता खालसा झाली आहे.

अगोदर आमदारकी गेली…

२०१९ मध्ये ऐन निवडणुकीत साथ सोडल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यावर प्रचंड राग होता. दोघांनी पिचड पिचड पिता-पुत्रांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी पिचड यांना साथ देणाऱ्या सीताराम गायकर यांच्यावरही टीका केली होती. ‘नाही त्याचं धोतर फेडलं तर मग बघा,’ अशी एकेरी आणि वैयक्तिक टीका त्यांनी केली होती. पुढे हेच गायकर आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आलेले आहेत.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. पिचड यांच्या ४० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची कमाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी करुन दाखवली. लहामटे इथून ५७ हजार ७८९ मताधिक्याने विजयी झाले. या परभवानंतर मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. पण पक्षांतराचा फटका बसला असं अजिबात वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पिचड यांनी दिली होती.

नुकतीच ग्रामपंचायतीतही गेली

मधुकर पिचड यांना ग्रामपंचायत निवडणुकीतही पराभवाचा धक्का बसला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील राजूर ही पिचड यांच्या मूळ गावची ग्रामपंचायच त्यांच्या हातून गेली. इथे 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने सत्ता काबीज केली. मात्र, सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा उमेदवार निसटत्या मतांनी विजयी झाला. इतकेच नाही तर अकोले तालुक्यातील ४५ पैकी २० ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. १६ भाजप ला मिळाल्या.

अगस्ती कारखान्यासाठी साठी शरद पवारांनी वर्षभरापूर्वीच फिल्डिंग लावली होती.

अगस्ती साखर कारखाना जिंकण्यासाठी शरद पवार यांनी मागच्या जवळपास वर्षभरापासून फिल्डिंग लावली होती. आधी ज्या गायकरांवर टीका केली त्यांनाच शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावून जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर गायकर राष्ट्रवादीसोबत पुन्हा आले.

त्यानंतर काही दिवसात पवार पुन्हा अकोले तालुक्यात गेले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा पिचड यांच्यावर टीका करून त्यांचे स्थानिक राजकारण संपविण्याचे आवाहन केले. तसेच लवकरच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे. हा कारखाना पिचड यांच्या ताब्यातून काढून घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू, अशी थेट ऑफरच पवारांनी दिली होती. त्यानंतर आता आजच्या निकालात पिचड यांची २८ वर्षांची सत्ता खालसा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page