पत्नीचे मित्रासोबत अनैतिक संबंध … पतीची आत्महत्या, इंदापुरातील घटना पती व मित्रास अटक..
इंदापूर, दि. २२ ( प्रतिनिधी ) पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्रास अटक करण्यात आली आहे. इंदापूर न्यायालयाने दोघा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जावेद जिलानी मुलाणी (वय ३२ वर्षे रा. बावडा, ता. इंदापूर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संदर्भात त्याचा भाऊ मुस्तफा जिलानी मुलाणी याने दिलेल्या फिर्यादीवरून जावेदची पत्नी व त्याचा मित्र प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत (रा. बावडा, ता. इंदापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुलाणी मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. सन २०१७ मध्ये त्याचा विवाह झाला. त्याचा बालपणापासून मित्र असणारा प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत त्याच्या घरी नेहमी येत असे. दोघांमध्ये पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार चालत असत. नेहमीचे येणे व पैशांचे व्यवहार यातून जावेदची पत्नी व प्रवीण यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. त्यावरून फिर्यादीचे जावेद व त्याच्या पत्नीबरोबर भांडण होत असे. त्या भांडणामुळे व अनैतिक संबंधामुळे जावेद नेहमी तणावात राहू लागला. व्यसन करू लागला. या कारणावरून प्रवीण व जावेदची पत्नी जावेदला वेळोवेळी मारहाण करत होते. या संदर्भात फिर्यादीने प्रवीण व जावेदच्या पत्नीला समजावून सांगितले होते. मात्र काहीच बदल झाला नाही. जावेदला ते दोघे त्रास देतच राहिले.
मागील दोन दिवसांपासून जावेद घरी न येता मुलाणी वस्ती जवळच्या ओढ्यावर अंघोळ करून तेथेच झोपत होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या घरी आला, त्यावेळी प्रवीणला घरात पाहून त्याने घरी का आलास अशी विचारणा केली. त्यावरून प्रवीणने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे ठार मारतो असे म्हणत तो जावेदच्या अंगावर चालून गेला. त्यामुळे भिऊन जावेद घरातून निघून गेला. फिर्यादीने प्रवीण यास जावेदला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला व घरातून निघून जाण्यास सांगितले. तो निघून ही गेला. त्या रात्री जावेद घराच्या ओट्यावर झोपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणने जावेदच्या घरी येऊन जावेदला दमदाटी केली व जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली,त्यामुळे जावेदने आत्महत्या केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील अधिक तपास करीत आहेत.