निनावी पत्रामुळे पंचायत समितीत गोंधळ..

जेजुरी, दि.८ ( प्रतिनिधी )
सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना नुकतेच पंचवीस हजाराची लाच घेताना अटक झाली.त्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचार कसा होतो याचे रंजक किस्से सर्वत्र चर्चिले जात असताना पुरंदर तालुक्यात देखील भ्रष्टाचार कसा होतो याबाबत थेट गटविकास अधिकारी यांचेवर निशाणा साधत निनावी पत्राद्वारे कळविले होते.
पत्रामध्ये पुरंरच्या प्राथमिक शिक्षकांची बोगस बिले काढलेली आहेत.त्यामध्ये वाल्हे येथील एका शिक्षकेचे पूर्वी बिल काढलेले असताना देखील सेटलमेंट करुन पुन्हा बिल काढून सदर रक्कम परस्पर वाटून घेतली.अशा प्रकारे अनेक शिक्षकांची परस्पर बिले काढून त्यांनी शिक्षण विभागात भ्रष्टाचार केला आहे.
शिक्षण विभागातील काही कर्मचारी शिक्षण विभागात कमी परंतू अर्थ विभागातच जास्त वेळ काम करताना पाहायला मिळतात.त्यामुळे संबंधित कर्मचारी शिक्षण विभागात कामाला आहेत की अर्थ विभागात ? हे समजत नाही.
शिक्षकांची बिले काढताना खूप भ्रष्टाचार केला आहे. बिले काढल्यानंतर त्यांनी शिक्षकांकडून पाच ते दहा हजार रुपये मागतात.याबाबत विचारणा केली असता सदर पैसे गटविकास अधिकारी,अर्थ विभाग यांना देखील द्यावे लागतात.त्यामुळे पैसे दिले तरच तुमची बिले निघतील असे सांगत सदर पैसे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एका शिक्षक एजंटाची नेमणूक केली आहे.
येथील काही कर्मचारी शिक्षकांची कोणतीच कामे वेळेत करत नाहीत.याबाबत विचारणा केली असता,’आम्हाला कॅम्पुटर नाही,प्रिंटर नाही,कोरे कागद नाहीत.त्यामुळे आम्हाला इतर विभागात जावून कामे करावी लागतात.’ असे सांगून अरेरावीची भाषा बोलतात.
त्यामुळे संबंधीतांची सखोल चौकशी करुन सदर भ्रष्टाचार बाहेर काढावा याबाबत निनावी अर्जाद्वारे गटविकास अधिकारी यांचेवर देखील भ्रष्टाचाराचा आरोप करीत चौकशी व्हावी असे निनावी पत्र दिले होते.
या पत्रावरुन सदर चौकशी व्हावी.अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे स्वतःच्या नावाने तक्रार करावी लागेल.असा इशाराही निनावी पत्राद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला होता.
संबंधित पत्राची प्रत पुरंदरचे आमदार संजय जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व अपंग प्रहार संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांना देखील दिले होते.
गटविकास अधिकारी यांनी सदर पत्राची दखल घेवून चौकशी करावी अशी मागणी प्रहार अपंग संघटनेमार्फत सुरेखा ढवळे यांनी देखील केली होती.त्यामुळे आज सोमवार दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत उगले यांनी दिपावली सुट्टी नंतर शाळा भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा बोलावली त्यामध्ये अनेक प्रशासकीय विषयासह निनावी पत्राचा देखील विषय झाला. सदर सभेला सुरेखा ढवळे देखील निनावी अर्जाची शहानिशा करण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी देखील याबाबत खातरजमा केली असता पंचायत समितीमध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचार झालेला नाही किंवा पैसे मागणी होत नाही असे सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी सांगितले.
पंचायत समितीशी निगडीत आरोपामध्ये तथ्य नसल्याचे सर्वांसमक्ष परखडपणे मांडत प्रशासन प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत उगले यांनी निर्णायक भूमिका बजावल्याचे सुरेखा ढवळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page