नितीन गडकरींच्या स्वप्नांचा होतोय कचरा ….पालखी महामार्गाच्या कामात मुरूमाऐवजी कचरा मिश्रीत मातीचा वापर…
जेजुरी, दि. २७ : आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ या पालखी महामार्गाचे काम होत असताना शासनाच्या नियमाने प्रमाणे हे काम होत नसून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कचरायुक्त मुरमा ऐवजी मातीची वापर होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोयीस्कर रित्या कानाडोळा करत असल्याचा आरोपही या भागातील शेतकरी करत आहेत.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांच्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतर त्यांनी या पालखी महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नेमलेल्या ब्लुम एल. एल. सी. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रविवार(ता.२७)रोजी प्रत्यक्षात कामावरती येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कचरा असणाऱ्या मातीचा सुमारे ५० मीटर लांबीचा भराव उचलून बाजूला टाकून त्याठिकाणी नियमानुसार मुरूम व खडी भरण्याच्या तात्काळ सूचना ठेकेदारास देण्यात आल्या
यावेळी स्थानिक नागरिकांनी पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये सदर चुकीच्या कामाचे ठिकाणे या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी कादबाने मळा या ठिकाणच्या कामाची पाहणी केली असता सदर कामांमध्ये मुरमाऐवजी माती व मोठ्या प्रमाणावर साडी,चोळी व कागदी कचरा आढळून आल्याने या रस्त्यातच कचरा डेपो उचलून या ठिकाणी आणल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले व संबंधित सर्व भागातील माती मिश्रीत मुरूमाचे नमुने हे तपासणीसाठी घेण्यात आले व त्या ठिकाणची माती, कचरा तातडीने हटवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला देत हे काम चुकीचेच असल्याची तत्वता मान्यता ही दिली.
या कामाबाबत यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती यावेळी अगदी नांगरटीतील मातीचे ढेकूळ असावेत अशा पद्धतीची माती या भागात टाकली होती. त्यावेळीही संबंधित यंत्रणे कडून मातीचे तपासणी झाली व सदर मातीही मुरूम असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे तक्रारदारही हतबल झाले.
तरी आता याबाबत सदर कंपनीच्या पेक्षाही वरिष्ठ पातळीवरती या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गांच्या कडून केली जात आहे.
*"तक्रार असलेल्या ठिकाणचे नमुने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेतले असून याबाबतचा अहवाल व आजच्या भेटीचा सर्व अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सादर केला जाईल. त्यांच्याकडून आवश्यक त्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या जातील. तर यापुढेही हे काम होत असताना ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क संपर्क करावा.*
- फारूक सय्यद, ब्लुम एल. एल. सी. टीम लिडर.
*" आता जरी मुरूम- मातीचे नमुने घेतले असले तरी या नमुन्यांच्या बाबत किती पारदर्शकपणे तपासणी होईल यात शंका असून सदर गुणवंता नियंत्रक तपासणीचे कार्यालय हे जेजुरी या ठिकाणी असताना आज पर्यंत त्यांच्या देखरेखी खाली या रस्त्याचे काम चालू आहे तर मंग हे सर्व चुकीचे काम त्यांच्या निदर्शनास का आले नाही,नागरिकांना तक्रार का करावी लागली हा मोठा प्रश्न आहे. "*
- समीर कामथे, प्रत्यक्षदर्शी शेतकरी शिवरी.
*"राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सुचनेनुसार ब्लुम या गुणवत्ता नियंत्रक तपासणी कंपनीने या कामाची पाहणी केली यावेळी रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. काही ठिकाणची भरावही त्यांनी उचलला पण ही चौकशी एवढ्यावरच न थांबता याबाबतचा अहवाल संबंधित कंपनीने सार्वत्रिक करावा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर काय कारवाई केली हेही शेतकऱ्यांना समजले पाहिजे.*
नवनीत ल. कादबाने, प्रत्यक्षदर्शी शेतकरी खळद.