नाझरे परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांत दहशत
जेजुरी, दि.२३ जेजुरीच्या पूर्वेला असणाऱ्या नाझरे जलाशयाच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाझरे जलाशयाच्या परिसरात नाझरे कडेपठार, नाझरे सुपे ही खेडी असून या परिसरारील ग्रामस्थांना गेल्या आठवड्यापासून बिबट्या दिसू लागला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती असल्याने अचानक बिबट्याचे दर्शन कधी रस्त्यावर, शेताच्या बांधावर होऊ लागल्याने शेतकरी वर्ग ही धास्तावला आहे. अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याने रात्रीच्या वेळी शेतकरी बाहेर पडायला घाबरू लागले आहेत. ऊस शेती असल्याने बिबट्या नेमका कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने या दोन्ही गावांबरोबर आजूबाजूच्या गावातूनही दहशत पसरू लागली आहे .
वन विभागाकडून याबाबत ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. वन विभागाने त्वरित याबाबत पिंजरा लावावा, बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.
या परिसरात मोठी ऊस शेती असली तरी ही दुग्ध व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर आहे. साहजिकच पाळीव जनावरे ही घरोघरी आहेत. शेत परिसरारील बिबट्या गावात येऊ लागला अथवा ग्रामस्थांबाबत अनुचित प्रकार घडला तर वन विभागाला याची जबाबदारी घ्यावी लागेल. अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने योग्य ती पावले ऊचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी केली आहे.