नाझरे जलाशयात ४५० दशलक्ष पाणीसाठा…पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
जेजुरी, दि.८ जेजुरी व पूर्व पुरंदर बारामतीच्या पश्चिम पट्ट्याची तहान भागवणाऱ्या नाझरे जलाशयात आज अखेर सुमारे ४५० दशलक्ष घनफुट एवढा पाणीसाठा झाला आहे. यामुळे जलाशयावर अवलंबून असणाऱ्या सुमारे ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक असणाऱ्या सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमतेच्या नाझरे जलाशयात पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गेल्या पंधरा दिवसात जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने कऱ्हा नदी वाहू लागले आहे. कऱ्हा नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे जलाशयात पाणीसाठा वाढतो आहे. सद्या नदीतून दररोज १५० ते १७५ क्यूसेस वेगाने पाणी येत आहे. जलाशयात आज ४६० दशलक्ष घनफुट एवढा पाणीसाठा होऊ शकला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी जलाशयात ३६८ दशलक्ष घफुट पाणीसाठा होता.
नाझरे जलाशयाच्या परिसरात यावर्षी आजअखेर ३५७ मिमी पर्जन्यवृष्टी झाली असून अजून ही पावसाची शक्यता असून भविष्यात जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत.