नाझरे कप येथे कर्मवीरांची जयंती साजरी सदाशिव अण्णा झेंडे ट्रस्ट कडून विद्यालयाला एक लाखांची देणगी
जेजुरी, दि.२६ नाझरे कप ( ता.पुरंदर) येथील नागेश्वर विद्यालयात आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या हस्ते कर्मवीर पाटलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, जेष्ठ नेते भानुकाका जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. झेंडे यांनी बहुजन व गोरगरीब मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून रयत शिक्षण संस्था काढली. आज या संस्थेचा वटवृक्ष बनला आहे.गोरगरिबांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. अशा संस्था इतरांना मार्गदर्शक असतात. या संस्थांना सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी मदत केली पाहिजे. असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी सदाशिव अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. पुणे जिल्हा बँकेच्या वतीने ५० हजार तर संस्थेच्या आर्थिक दुर्बल सहाय्यता निधीतून ५० हजार रुपये मदत निधी देण्याचे आश्वासन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिले. एकनाथ काका प्रतिष्ठानच्या वतीने दहा मुलींना सायकल वाटप करण्याचा मनोदय अध्यक्ष संतोष जगताप यांनी व्यक्त केला. उद्योजक रामभाऊ खैरे यानी ही ५० हजार रुपयांची देनगी जाहीर केली. विनायक आटोळे यांच्याकडून विद्यालयाला स्पीकर संच देण्यात येणार आहे.
यावेळी डॉ.दिगंबर दुर्गाडे, संतोष जगताप, भानुकाका जगताप यांची भाषणे झाली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. देठे, शिक्षक डी. के. भावसार, एस.डी. निकुम, कर्मचारी डी. बी.गावडे, कपिल रोटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.