नागेश्वर विद्यालयाला एक लाखांची मदत
सदाशिवअण्णा झेंडे ट्रस्ट कडून भरीव देणगी
जेजुरी, दि.१३ पुरंदर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या नाझरे कप येथील नागेश्वर विद्यालयाला आज सदाशिव अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट कडून सुमारे एक लाख रूपायांची मदत देण्यात आली. माजी सनदी अधिकारी ट्रस्ट चे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश विद्यालयाच्या शिक्षकांकडे सुपूर्त करण्यात आला.
मध्यंतरी या विद्यालयात संभाजीराव झेंडे यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेचे संथापक कै. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली होती. यावेळी संभाजीराव झेंडे यांनी रयत शिक्षण संस्थेचे महान कार्य पाहता या संस्थेच्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्यासाठी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला पाहिजे असे स्पष्ट केले होते. त्याची सुरुवात म्हणून सदाशिव अण्णा ट्रस्ट कडून एक लाख रुपयांची भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांनी अश्वासनानुसार विद्यालयला एक लाखांचा धनादेश सुपूर्त केला.
या वेळी विद्यालयाचे शिक्षक डी के भावसार, कर्मचारी डी. बी.गावडे, कपिल रोटे, तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे,माजी सरपंच शिवाजी नाझीरकर, माऊली नाझीरकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बारीकराव नाझीरकर, सदाभाऊ चिकणे, साहेबराव नाझीरकर, अंकुशराव नाझीरकर, दादा गाढवे आदी उपस्थित होते.