नागरसेविकेला २५ लाखांची खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल, पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे, दि.५
पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करीत एका नगरसेविकेला माहिती अधिकार कार्यकर्त्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर नगरसेवक पद घालवू, अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांत संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोसले याच्याविरुद्ध यापूर्वी खंडणीचे ३ व इतर ३ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
भोसले याने फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याचे कारण सांगून त्याबाबत पुणे महानगरपालिका व पीएमआरडी येथे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, यासाठी अर्ज केले होते.या अर्जाची तपासणी होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता.
तरीही ‘महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करेल’ अशी भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. इतकंच नाही तर संबधित व्यक्तीने 23 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून नगरसेविकेच्या पतीकडे 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. हा प्रकार सातत्याने होत असल्याने अखेर फिर्यादीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही.त्यानंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली.
त्यांच्या अर्जाची चौकशी करुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहेत.