नराधम पतीने लावले वेश्याव्यवसायला, तरुणीची पोलिसांत फिर्याद, पती आणि मित्रांना अटक
:एका पबमध्ये झालेल्या ओळखीतून मैत्री, लग्न करतो असे सांगून तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने त्याने तरुणीला वेश्याव्यवसायाला लावले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील वडगावशेरी परिसरात समोर आला आहे.
तरुणी पोलिसात तक्रार करेल म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नदेखील केले. मात्र, त्यानंतरसुद्धा त्याचा हा प्रकार सुरूच राहिला.
या प्रकरणी एका ३० वर्षांच्या तरुणीने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत वडगाव शेरी, गोवा, बेंगलोर, सिंगापूर येथे घडला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची कोलकात्याची आहे. शहरातील एका पबमध्ये २०१६ मध्ये दोघांचा परिचय झाला होता. ओळख वाढल्यानंतर लग्नाच्या आमिषाने आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. त्याने ग्राहक आणून फिर्यादीची किंमत ठरविली. ग्राहकाबरोबर तिला जबरदस्तीने गोवा येथे ४ दिवसांकरिता पाठविले. त्या ग्राहकाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीच्या घरी सांगण्याची व पोलीस रेडमध्ये अडकविण्याची धमकी देत वेगवेगळ्या ग्राहकांबरोबर बंगलुरू, गोवा येथे पाठवत असे. तसेच पासपोर्ट काढून दोन वेळा सिंगापूर येथे पाठवून फिर्यादीकडून वेश्याव्यवसाय करून घेतला.
मित्राच्या रूमवर फिर्यादीला ठेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली, तेव्हा औषध देऊन तिचा गर्भपात केला. फिर्यादी तक्रार करील, या भीतीने फिर्यादीसोबत आळंदी येथे लग्न केले. त्यानंतरही तिला ग्राहकांकडे पाठवून तिची शारीरिक पिळवणूक केली. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.