नगरपालिका कार्यालयातील नेमणूकीबाबत समावेशन आदेश रद्द करा :- आ. संजय जगताप अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा…
जेजुरी, दि.२१ ( प्रतिनिधी )
नगरपालिकेतील वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या मा विभागीय आयुक्तांनी काढलेले समावेशन आदेशामुळे स्थानिक कर्मचार्यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे. यामुळे सदरचा आदेश रद्द करावा अथवा यामध्ये दुरूस्ती करावी अशी मागणी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी मा विभागीय आयुक्तांनी केली आहे. याबाबत जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा विणा सोनवणे, माजी सदस्य आणि सफाई कर्मचाऱ्यांनी आमदार संजय जगताप यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या व सदर आदेश रद्द करण्याची मागणी शासनाकडे करण्याची विनंती केली आहे.
जेजूरी नगरपालिकेत १ शिपाई आणि १४ सफाई कर्मचार्यांची पदे भरण्याबाबत मा विभागीय आयुक्तांनी आदेश दिले आहेत. परंतु नेमणूक दिलेले सर्व कर्मचारी हे पुणे जिल्ह्याबाहेरील म्हणजेच चाळीसगाव, नंदूरबार, भगूर आदी ठिकाणचे आहेत. यामुळे वर्षानुवर्षे रोजंदारीवर जेजुरी नगरपालिकेत काम करणारे स्थानिक कर्मचाऱ्यांवर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे. या आदेशामुळे या स्थानिक कर्मचाऱ्यांत नैराश्य पसरले आहे. तसेच वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचारी स्थानिक असावेत अशी आग्रही मागणी मा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची आहे.
याबाबत आमदार संजय जगताप यांनी, तातडीने विभागीय आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच जिल्ह्य़ातील भोर, दौंड, शिरूर, आळंदी, राजगुरुनगर या नगरपालिकांत अशा प्रकारे इतर जिल्ह्यातील कर्मचार्यांचे समावेशन होऊन स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे म्हणून या आदेशाला विरोध करा अशी आमदार संग्राम थोपटे, आमदार अशोक पवार, आमदार राहुल कुल तसेच नगरपालिका क्षेत्रातील इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मा विभागीय आयुक्तांना मंगळवारी ( दि २२ ) जेजुरी नगरपालिकेचे माजी पदाधिकारी व सफाई कर्मचारी यांसह भेटून सदर आदेश रद्द करण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगत आमदार संजय जगताप यांनी, आदेश रद्द अथवा दुरूस्त न झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा विणा सोनवणे, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, अनिल विरकर, हेमंत सोनवणे यांसह सफाई कर्मचारी उपस्थित होते