धक्कादायक…. सूड भावनेतून बालकाचे अपहरण २० कोटींच्या खंडणीसाठी केला खून, दोघे जेरबंद…
पिंपरी : सोसायटीत राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकासोबत जुन्या भांडणाचा रागातून सूड घेण्याच्या भावनेतून तसेच खंडणीसाठी त्याच्या सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केला. पिंपरीतील मासुळकर कॉलिनीतील ग्रीनफील्ड सोसायटी येथे गुरुवारी (दि. ८) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांत दोन आरोपींना अटक केली.
आदित्य गजानन ओगले (वय ७, रा. ग्रीनफील्ड सोसायटी, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मंथन किरण भोसले (वय २०, रा. ग्रीनफिल्ड सोसायटी, पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर (वय २१, रा. साईकृपा हाऊसिंग सोसायटी, घरकूल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मयत आदित्य याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (वय ४९, रा. ग्रीनफील्ड सोसायटी, मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आदित्य हा खेळण्यासाठी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. त्यावेळी आदित्य याच्या अपहरणासाठी मंथन याने मित्र अनिकेत याला साथीला घेतले. तीन ते चार तासांपूर्वीच ते दोघेही एका चारचाकी वाहनातून सोसायटीत आले. त्यानंतर आदित्य खेळताना पाहून अनिकेत याने त्याच्या जवळ जाऊन तुझी आत्या आली आहे, गाडीत बसली आहे, असे म्हणत आदित्य याला गाडीत बोलविले. गाडीत आत्या आहे की नाही, हे पाहण्यासाठी आला असताना आदित्यला ओढत गाडीत बसविले. त्यावेळी आदित्यने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आरोपींनी आदित्यचे नाक, तोंड दाबत गळा आवळला. यात आदित्यचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून गाडी घेऊन निघून गेले. त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी आदित्यचा मृतदेह एका पोत्यामध्ये बांधून भोसरी एमआयडीसी परिसरातील एका जुन्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन टाकला. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून मुलाच्या वडिलांना व्हॉट्सअप मेसेज करून २० कोटींच्या खंडणीची मागणी केली. या मेसेजच्या आधारे तांत्रिक शोध घेत पोलिसांनी आरोपींचा छडा लावत आरोपींना अटक केली.