देश एकसंध ठेवण्याचे सामर्थ्य हिंदी भाषेत- डॉ. नानासाहेब जावळे

जेजुरी, दि.१५ ( प्रा. डॉ. बेबी कोलते ) स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आंदोलकांनी हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून हिंदी भाषेला आंदोलनाची भाषा बनवले व संपूर्ण देशातील आंदोलकांना एकत्र केले. याच भाषेतून अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून व पत्रकारितेतून देश प्रेम निर्माण करण्याचे काम केले. यामुळेच देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य हिंदी भाषेत आहे. असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य व केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाचे प्रो. डॉ. नानासाहेब जावळे यांनी व्यक्त केले.

ते जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात हिंदी दिनाच्या निमित्ताने ‘हिंदी कल, आज और कल’ या विषयावर बोलत होते. पुढे ते म्हणाले, हिंदी ही रोजगाराची भाषा आहे. हिंदी समजणाऱ्यांना केवळ नोकरीमध्येच नव्हे तर व्यवसायामध्येही अनेक संधी आहेत. हिंदी कौशल्य भाषेचे ज्ञान व कौशल्य असणाऱ्यांना अनुवाद, जाहिरात, पटकथा लेखन, डबिंग,टंकलेखन, बँकिंग, स्पर्धा परीक्षा अशा अनेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे हिंदीकडे उपजीविकेची भाषा म्हणूनही पाहिले जाते.
महाविद्यालयांमध्ये हिंदी दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हिंदी दिवस पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. निबंध स्पर्धेमध्ये ऋतुजा सुनील शिंदे, सिद्धी राजेश चोरगे, तर अश्विनी सुरेश दोरगे व प्रतीक्षा प्रवीण जगताप, स्वरचित कविता काव्य वाचन स्पर्धेत अभिषेक तुकाराम चौरे, हर्षल उद्धव पाटील , तर आकाश विठ्ठल गायकवाड वक्तृत्व स्पर्धेत ज्योती चोरगे व कोमल झगडे भित्तीपत्रक स्पर्धेत हर्षल उद्धव पाटील नेहा दत्तात्रय भोर यांनी यश संपादन केले. सर्व स्पर्धांचे परीक्षण प्रा.किशोरी ताकवले, प्रा .संगीता पवार व डॉ. शिवाजी भिंताडे यांनी केले. सदर प्रसंगी हर्षल पाटील व ज्योती चोरगे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांनी केले.स्वागत प्रा. संगीता पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सोनवले हिने तर आभार ज्योती चोरगे हिने मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page