दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदत वाढ बारावी १५ नोव्हेंबर, तर दहावी २५ नोव्हेंबर शाळांमार्फत अर्ज भरता येणार…

पुणे , दि. ५ ( प्रतिनिधी) आगामी फेब्रुवारी- मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत शाळांमार्फत अर्ज भरता येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा हाेणार आहेत. या परीक्षेस बसणारे विद्यार्थी, तसेच नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी यांनाही ही सवलत आहे. तसेच नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरावे लागतील, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

याआधी घाेषित केल्याप्रमाणे बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १० नोव्हेंबरला संपणार आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी २५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

शाळांसाठी अशी आहे मुदत

  • माध्यमिक शाळांना चलनाव्दारे बँकेत शुल्क भरण्यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत.
  • तर प्री-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करण्यासाठी मुदत १ डिसेंबर.
  • बारावीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह आणि विलंब शुल्कासह १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील.
  • उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी २ डिसेंबरपर्यंत मुदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page