तर शिवसेना थेट शिवतीर्थवर उतरणार.. दसरा मेळावा ही घेणार …
मुंबई, दि. १९ शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे.
शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार, यावर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. या निर्णयाची वाट शिंदे गट आणि ठाकरे गट पाहत आहे. मात्र निर्णय घेण्याआधी विधी व न्याय विभागाचा सल्ला मुंबई महापालिका घेत असल्याची माहिती आहे. मात्र यामध्ये शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी फक्त आणि फक्त शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. इतर कुठल्याही मैदानाचा विचार शिवसेना करणार नाही
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोघांचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आले आहेत. पहिला अर्ज शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याने शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. मात्र मुंबई महापालिका हे प्रकरण ताणत असून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावं याकरता शिंदे गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांचा अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने बीकेसीतील ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारल्यास शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झालं आहे.