जेजुरी शहराला एमआयडीसी कडून पाणी घेणार – आ.संजय जगताप

जेजुरी, दि.२८ निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे नाझरे जलाशयावरून होणारा पाणीपुरवठा शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करू शकत नाही. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून जेजुरी औद्योगीक क्षेत्राला वीर जलाशयातून होणाऱ्या पाणी योजनेतून पाणी घेण्यात येणार असल्याची माहिती पुरंदर चे आ.संजय जगताप यांनी सांगितले.

जेजुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाझरे जलाशयात गाळमिश्रित पाणी शिल्लक असल्याने पाणी पुरावठ्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुरंदर हवेली चे आ.संजय जगताप यांनी औद्योगिक महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्याकडे पुणे येथे बैठक घेतली होती. बैठकीला आमदार संजय जगताप , जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा सौ. वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, उद्योजक रवी जोशी, पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, त्याचबरोबर औद्योगिक महामंडळाचे सहअभियंता सुधीर नागे, बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, जेजुरीचे उपअभियंता ए. एस. साळवे आधी उपस्थित होते.
बैठकीत जेजुरी नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे जलाशयात अत्यल्प पाणीसाठा असल्याने जेजुरी औद्योगिक महामंडळाच्या जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतून पाणी देण्यात यावे दिवसाआड सुमारे २०००क्युबिक मीटर एवढे पाणी मिळावे असा प्रस्ताव औद्योगिक महामंडळाकडे ठेवण्यात आला. यावर बैठकीत चर्चा होऊन २००० क्युबिक मीटर पाण्यासाठी येणारे बिल जेजुरी नगरपालिकाने भरावे याबाबतही चर्चा करण्यात आली. पालिकेला जेजुरी शहरासाठी पाणीपुरवठा करणे गरजेचे असून त्या संदर्भात येणारे पाण्याची बिल जेजुरी नगरपालिका अदा करेन, यासंदर्भातील दर निश्चिती करून औद्योगिक महामंडळाने आम्हास कळवावे व हा प्रस्ताव महामंडळांने मंजूर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. औद्योगिक महामंडळाकडून लवकरात लवकर दर निश्चिती करून या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत मान्यता देण्यात आल्याची माहिती जेजुरी नगरपालिकेची मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी सांगितले.

जेजुरी शहराला वीर जलाशयाखालील मांडकी डोह येथून पाणीपुरवठा केला जातो मात्र पुणे पंढरपूर पालखी महामार्गाची काम सुरू असल्याने या योजनेची पाईपलाईन काढण्यात आलेली आहे यामुळे जेजुरी औद्योगिक महामंडळाकडून पाणीपुरवठा व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत
पुढील पंधरा दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन याही योजनेतून शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो अशी माहिती जेजुरी नगरपालिकेचे गटनेते सचिन सोनवणे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page