जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात निकृष्ट दर्जाची धोकेदायक विकासकामे, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा, खा. सुळेंना निवेदन
जेजुरी, दि.२९ रेल्वेस्थानक आणि तिर्थक्षेत्राचे ठिकाण असलेल्या जेजुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने रस्ते व सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे काम सुरू करण्यात आलेले असून सदरील काम अत्यन्त निकृष्ट दर्जाचे होत आहे.तसेच भुयारी व बंद पाईपलाईन टाकून हे काम करण्याची गरज असताना दोन फूट रुंद व १५ ते २०फूट खोल चर खोदून गटाराचे काम करण्यात येत असल्याने नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्य व जीविताला धोका निर्माण झाला आहे. चर खोदून व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून उघडे गटाराचे काम त्वरित थांबवावे… भुयारी बंद पाईपलाईन टाकून हे काम करावे अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जेजुरी रेल्वेस्थानकाच्या समोर बुधवारी (दि.१) आमरण उपोषण करणारअसल्याचे माजी नगरसेवक तथा उद्योजक मेहबूब पानसरे ,सामाजिक कार्यकर्ते संजय माने,विजय खोमणे , रोहिदास कुदळे, अलकाताई होले यांनी सांगितले आहे.
पुणे – कोल्हापूर लोहमार्गावर ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वेस्थानक असून गेली ५ वर्षांपासून खा.सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा व प्रयत्नातून रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होऊन येथील चेहेरा मोहरा बदलला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रस्ते व गटारे यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे गालबोट लागत आहे.रेल्वे स्थानकासमोर मोठी नागरी वसाहत असून नागरिकांच्या घरापुढेच १५ते२० फूट खोल व ३फूट रुंदीचा चर खोदून सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे काम सुरू आहे.चर खोदून व बांधकाम करून उघड्या गटारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांच्या जिवीतालाही धोका निर्माण झाला आहे.रेल्वे प्रशासनातील ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे पाणी पुरवठा करणारी पिण्याची पाईपलाईन सुद्धा जागोजागी फुटली असून त्यामध्ये सांडपाणी मिसळले जात आहे.येथील भौगोलिक दृष्टया सांडपाणी गटाराची दिशा सुद्धा चुकवण्यात आली आहे.त्यामुळे भविष्यकाळात हे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार आहे.खंडेरायाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रचलित असलेल्या या रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते.येणारे भाविक व लहानमुले यांचा विचार करता पुढील दुर्घटना टाळण्यासाठी बंदीस्त व बंद पाईपलाईन भुयारी गटार करावे . संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे मुरुमीकरण व डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे केलेले असून त्याची चौकशी व्हावी .रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारावा अशा आशयाचे निवेदन पुणे विभागाचे व्यवस्थापक यांना दिले आहे. सोमवारी(दि.३०) खा. सुळे यांच्यासमवेत पुणे येथे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन आहे .तेथे मागण्या मान्य न झाल्यास परिसरातील नागरिक आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबतील असे नगरसेविका अमिना पानसरे यांनी सांगितले.