जेजुरी येथील बर्जर पेंट कंपनीतील स्फोटात कामगाराचा मृत्यू;
आकस्मिक मृत्यूची नोंद,
जेजुरी दि. ३१( प्रतिनिधी) जेजुरी एम आय डी सी मधील बर्जर पेंट इंडिया लिमिटेड या कंपनीत शुक्रवार दि.३० रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बॉयलरचां स्फोट होवून त्यात एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला . या मृत्यू झालेल्या कामगाराला न्याय मिळावा यासाठी कंपनीतील कामगारांनी सदर तरुणाचा मृतदेह कंपनीच्या गेट समोर आणून आंदोलन केले .
रोहित जयवंत माने वय २८ रा राख ता पुरंदर जि पुणे असे या कंपनीतील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी माहिती अशी की, जेजुरी औद्योगिक वसाहतीतील बर्जर पेंट इंडिया लि. ही कंपनी असून शुक्रवार दिनांक ३० रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात रोहित माने हा तरुण कामगार जळून गंभीर जखमी झाला. सदर कामगार सुमारे ९० टक्के भाजल्याने त्यास ससून रुग्णालयात रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. ससून रुग्णालय तून या तरुणाचा मृतदेह सुमारे दोनशे कामगारांनी शववाहिनितून बर्जर पेंट कंपनीच्या गेट समोर आणून मृत कामगारांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले .
यावेळी कंपनीतील कामगार, शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे,अतुल म्हस्के, मनसेचे उमेश जगताप, काँग्रेसचे हेमंत सोनवणे, भाजपचे गणेश भोसले यांनी सदर मयत कामगारांच्या आई व वडिलांना एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य तसेच मृत कामगारांच्या नातेवाईकाला कंपनीत कायम स्वरुपी मदत द्यावी अशी मागणी केली. यावेळी कामगार संतप्त झाले होते. अखेर कंपनी व्यवस्थापनाने सदर मृत कामगारांच्या आई व वडिलांना एक कोटी रुपये व नातेवाईकांस कायम नोकरी तसेच कंपनीत कामगारांसाठी सुरक्षा व्यवस्था देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सदर मृत कामगारांच्या नातेवाईक व कंपनीतील कामगारांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला. राख येथे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोहित माने यांना ससून हॉस्पिटल, पुणे येथे ऍडमिट केले होते. उपचार सुरू असताना ते मयत झालेचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. या संदर्भात जेजुरी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे हे करीत आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा कंपन्यांतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अगोदर ही महिण्यापूर्वीच येथील आय एस एम टी या कंपनीत असाच अपघात झाला होता.