जेजुरी पोलीस अकॅशन मोडवर,मोरगाव चौकात नाकेबंदी
जेजुरी, दि.२५ ( प्रतिनिधी ) नव्याने जेजुरी पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मंगळवार दि.२५ रोजी जेजुरीतील मोरगाव जेजुरी रोड वरील आंबेडकर चौकात नाकाबंदी करून अनेक वाहनांवर दंडात्मक करवाई केली. कारवाई पाहून जेजुरी पोलीस ऍक्शन मोडवर आल्याची चर्चा नागरिकांतून सुरू झाली आहे.
जेजुरी आणि परिसरात ट्रीपल सीट दुचाकी वाहने चालवणे, विना परवाना वाहन चालवणे, वाहनांना काळ्या फिल्म लावणे, अवैद्य वाहतूक करणे, वाहनांना झालेले दंड न भरणे आदी बाबत जेजुरी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारीनुसार जेजुरी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई ही करण्यात आली. तसेच चार चाकी वाहनांच्या रंगीत फिल्म काढून टाकण्यात आल्या.
अचानक झालेल्या या नाकाबंदीमुळे वाहन चालक गडबडून गेले होते. पोलिसांच्या या कारवाईचे जेजुरीकरांतून स्वागत होत आहे.
या नाकाबंदी मोहिमेत पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक फौजदार चंद्रकांत झेंडे, संदीप भापकर, उदय पवार, संदीप पवार, कैलास सरक, विनोद माने, अण्णा देशमुख, सचिन किवळे, भूषण कदम आदिंनी सहभाग घेतला होता.
या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला असून अशाप्रकारची कारवाई दररोज सुरू ठेवणार असल्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी सांगितले.