जेजुरी गाव मंडळाची दहीहंडी जल्लोषात
ठाण्याच्या शिवतेज महिला मंडळाने फोडली दहीहंडी
जेजुरी , दि. २२ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत परंपरे नुसार दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो. जेजुरी गाव दहीहंडीउत्सव मंडळाने आयोजित केलेली दहीहंडी ठाणे येथील शिवतेज महिला मंडळाने फोडली. हा उत्सव पाहण्यासाठी जेजुरीकर नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
जेजुरीच्या पालखी मैदानावर आयोजित या दहीहंडीचे उदघाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते संतोष जुवेकर,अभिनेत्री प्रार्थना बेहरे,चित्रपट निर्माते महेश पटेल यांनी सिलीब्रेटी म्हणून हजेरी लावली . जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे,गटनेते सचिन सोनवणे,सर्व नगरसेवक व कॉंग्रसचे कार्यकर्ते उपस्थित होते. जेजुरी गाव दहीहंडी उत्सव मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक हेमंत सोनवणे,अध्यक्ष व जेजुरी शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ईश्वर दरेकर,पदाधिकारी रोहित सातभाई,पंकज निकुडेपाटील ,श्याम दरेकर ,जयदीप निकुडे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
जेजुरी गाव दहीहंडी उत्सव मंडळाने नागरिकांच्या सहभागातून हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला आहे.पुणे शहरा नंतर जेजुरीत भव्यदिव्य सोहळा पाहण्यास मिळाला.मंडळाच्या पदाधिकार्यांचे मोठे योगदान आहे असे यावेळी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
यावेळी ठाणे येथील शिवतेज महिला मंडळाच्या ७० महिलांनी सलामी देवून रसिकांचे लक्ष वेधून घेतले.पाच थर लावून या मंडळाने दहीहंडी फोडली.या मंडळाला एकाव्वन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात व दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या संख्येने जेजुरीकर व पंचक्रोशीत नागरिक उपस्थित होते.