जेजुरी गडावर वाढती अतिक्रमणे….प्रशासनाचे दुर्लक्ष
जेजुरी, दि. २४ ( बी.एम. काळे ) तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर वाढू लागली असून भाविकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या बाबत देव संस्थानचे प्रशासन मात्र दुर्लक्षच करताना दिसत आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा गडाच्या पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे दिसून येत आहेत. गडाच्या नंदीचौकापासून ते गडकोटाच्या मुख्य प्रवेश द्वारापर्यंत तसेच गडकोटातून बाहेर पडून गड उतरण्याच्या मार्गावर ही पथारी वाले, पेढेवाले, फोटो व्यवसायिक, खेळणी, नारळ विक्रेते, भंडार खोबरे विक्रेते, सरबत विक्रेते आदी व्यवसायिकांनी संपूर्ण पायरीमार्ग अडवल्याचे चित्र आहे. पायरीमार्गावरून चढताना उतरताना देव दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत आहे. भाविकांनी एखाद्या अतिक्रमण करणाऱ्याला हटकले तर त्याला शिवीगाळ केली जात असल्याने भाविक कसरत करीतच देव दर्शनाला जात आहे. याबाबत बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांनी देव संस्थान प्रशासनाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडे याबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली तरी ही पुन्हा अतिक्रमणे होत आहेत. जेजुरी गडाचा पायरीमार्ग हा देव संस्थान च्या अखत्यारीत येत असला तरी ही पायरी मार्गाच्या कठड्याच्या पलीकडे महसूल विभागाची जागा असल्याने अतिक्रमणे हटवण्यात अडचणी येत आहेत. देव संस्थान कडून पाच फोटोग्राफी व्यवसायिक, एक उपहार गृह, रसवंती गृह, कॅसेट सेंटर, आठ जनांनाच रीतसर टेंडर कडून देव संस्थान च्या जागांमध्ये व्यवसायाला रीतसर टेंडर काढून परवानग्या दिलेल्या आहेत. इतर कोणाला ही परवानग्या दिलेल्या नसून ती सर्व अतिक्रमणे आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे. अतिक्रमणे धारक हे स्थानिक नसल्याचे ही समजते. स्थानिकांनी जागा अडवून त्या बाहेरगावच्या व्यावसायिकांना अथवा कामगार ठेवून भाडे पट्ट्याने जागा दिल्या आहेत.
यात फोटोग्राफी चा व्यावसाय करणारे मार्गावरच उभे राहून भाविकांना फोटो काढण्यासाठी आग्रह धरीत असल्याने मार्गावर भाविकांना अडथळे निर्माण होत आहेत. पेढा व्यवसाय करणाऱ्यांनी जेथे जागा मिळेल तेथे अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले आहेत.
सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. लग्नसराई, सुगीचे दिवस संपल्याने राज्यभरातून येथे हजारो भाविक देव दर्शन तसेच कुल धर्म कुळाचाराचे धार्मिक कार्ये उरकण्यासाठी येत आहेत. अतिक्रमनांमुळे पायरीमार्गावरून ये जा करणे जिकिरीचे बनले आहे. देव संस्थान प्रशासनाने याबत गांभीर्याने दखल घेणे गरजेचे बनले आहे.
पायरीमार्गावरील अतिक्रमणे अनेकदा हटवली तरी ही ती होतच आहेत. वारंवार कारवाई केली जात असून जेजुरी शहर विकास आराखडा अंतर्गत लवकरच मंदिर गड संवर्धन या पहिल्या टप्प्यात गडाची पहिली पायरी ते मुख्य मंदिर शिखरापर्यंत सुमारे ११८ कोटी रुपये खर्चून भाविकांच्या सोयी सुविधा, गडकोट दुरुस्त्या, वीज पाणी आदी अनेक कामे सुरू होणार आहेत. त्यांची निविदा प्रक्रिया ही पूर्ण झाली असून पुढील दोन वर्षात ३१ मार्च २०२५ पर्यंत ही संपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहेत. या कामांच्या अनुसंघाने जेजुरी गडावरील अतिक्रमणे निघतील असे देव संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सांगितले.