जेजुरी गडावर चंपाषष्टी षडरात्रोत्सव सुरू,शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना
जेजुरी, दि.२६ तीर्थक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावर गुरुवारी(दि.२४)सकाळी ११वाजण्याच्या सुमारास विधिवत धार्मिक विधी होत श्रींची घटस्थापना करण्यात आली. आणि सहा दिवस चालणाऱ्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
खंडेरायाच्या धार्मिक विधी आणि जत्रा यात्रा उत्सवामध्ये (चंपाषष्ठी) षडरात्रोत्सवाला विशेष महत्व आहे. मार्तंड भैरवाचा अवतारदिन तर सहाव्या दिवशी मणी आणि मल्ल दैत्यांचा संहार असे या उत्सवाला महत्व आहे मार्गशीर्ष मासाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुद्ध १प्रतिपदेला या उत्सवाला सुरुवात होते.व सहाव्या दिवशी विधिवत घट उठविण्यात येऊन पूजा अभिषेक कुलधर्म -कुलाचार करीत वांगेभरीत रोडगा व कांद्याची पात असा नैवेध श्रीना अर्पण करीत सोहळ्याची सांगता होते.
सालाबादप्रमाणे मुख्य गाभाऱ्यामध्ये पाकाळणी (संपूर्ण गाभारा स्वच्छ करणे मुख्य मूर्तींसह उत्सवमूर्तींना नवीन पोशाख परिधान करणे) पार पडल्यानंतर पुजारी सेवेकरी वर्गाने सनई चौघड्याचा मंगलमय वाद्यांमध्ये खंडेरायाच्या उत्सवमूर्ती गडकोट प्रदक्षणा करीत बालद्वारी येथे आणण्यात आल्या वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी व पुरोहित प्रसाद खाडे यांचे वेदमंत्रपठणात करवीरपिठाचे श्री नृसिंह भारती शंकराचार्य यांचे हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.यावेळी पुजारी गणेश आगलावे ,चेतन सातभाई ,बाळकृष्ण दिडभाई ,मल्हार बारभाई, अनिल आगलावे ,बापू सातभाई, अतुल मोरे ,हनुमंत लांघी,सतीश कदम ,देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे ,विश्वस्त राजकुमार लोढा ,पंकज निकुडेपाटील ,संदीप जगताप,शिवराज झगडे ,मुख्याधिकारी राजेंद्र जगताप,अधिकारी संतोष खोमणे ,गणेश डीखळे ,माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे ,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर पुजारी सेवेकरी वर्ग व पुणे येथील खंडोबा भक्त शेळके यांच्यावतीने खंडेरायाचा मुख्य गाभारा व मंदिर पानाफुलांनी सजविण्यात आले आहे.गडकोट आवाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.