जेजुरी औद्योगिक वसाहतीत लोकल स्टेशन आणि पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडाव्यात कामगार आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खासदार सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी…

पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघातील जेजुरीस भेट देणारे भाविक तसेच औद्योगिक वसाहतीचा विचार करता पुणे ते लोणंद लोकलला एमआयडीसी मध्ये एक स्टेशन द्यावे. याशिवाय पुरंदरहून पुणे आणि कोल्हापूर बाजारपेठेत भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादने पोहोचवण्यासाठी पॅसेंजर रेल्वेला मालगाडीच्या बोगी जोडव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खा. सुळे यांनी ही मागणी केली आहे. जेजुरी हे तीर्थक्षेत्र म्हणून देशभर विख्यात आहेच याशिवाय येथे मोठी औद्योगिक वसाहतही आहे. हजारो कामगार या वसाहतीत काम करतात. या कामगारांच्या सोयीसाठी पुणे ते लोणंद दरम्यान लोकल सेवा मंजूर आहे. येथील कामगारांना एमआयडीसी परिसरातच उतरण्याची सोय झाली तर अधिक सोयीचे होईल. ही गरज लक्षात घेऊन पुणे ते लोणंद या मार्गावर जेजुरी एमआयडीसी परिसरात एक स्टेशन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबरोबरच या मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडीला मालगाडीच्या बोगी जोडण्यात याव्यात अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे. पुरंदर तालुक्यातून भाजीपाला तसेच फळे-फुले आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर पुणे तसेच कोल्हापूर बाजारात जातात. तथापि येथून जाणाऱ्या पॅसेंजर गाडीला मालवाहतूकीचे डबे जोडलेले नसल्याने शेतकऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परिणामी त्यांना प्रवासखर्चच मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. पॅसेंजर गाडीला मालवाहतूकीचे डबे जोडले तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी खर्चात व सहज पुणे आणि कोल्हापूर येथे पोहोचविणे शक्य होईल. तरी या गाडीला मालवाहतूकीचे डबे जोडण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे खा. सुळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page