जेजुरीत मर्दानी दसऱ्याची तयारी, खंडोबा मंदीर आजपासुन भाविकांसाठी खुले….
जेजुरी, दि. २३ जेजुरी विकास आराखडया अंतर्गत सुरु असलेल्या कामामुळे जेजुरीचे खंडोबा मंदीर भाविकांसाठी २९ ऑगस्टपासुन बंद होते. मंदीरातील गाभाऱ्यातील कामे
उरकल्याने भाविकांच्या दर्शनासाठी मंदीर आजपासुन खुले केले जाणार असल्याचे मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले.
जेजुरीचे मंदीर बंद असल्याने भाविकांची गैरसोय होत होती.कुलधर्म कुलाचाराचे विधी थांबले होते.उत्सवाचे दिवसही आता सुरु झाले आहेत.भाविकांना सांभाळत
उर्वरित कामे चालु राहतील.त्यामुळे आज पासुन मंदीर भाविकांसाठी खुले केले जात असल्याचे श्री.खोमणे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती
दिली. यावेळी विश्वस्त पांडुरंग थोरवे,डॉ.राजेंद्र खेडेकर,अनिल सौदडे,मंगेश घोणे,अड.विश्वासराव पानसे आदी उपस्थित होते.
दसरा उत्सावाची तयारी पुर्ण झाली आहे. विद्युत रोषणाई,फटाक्यांची आतिषबाजी,रस्ता दुरुस्ती आदी नियोजन करण्यात आले आहे. पालखी देव भेट होते त्या रमना
परिसरा पर्यंत विजेचे खांब लावण्यात आले आहेत. तलवार स्पर्धेची तयारी पुर्ण झाली असुन यावेळी बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे अशी माहीती विश्वस्तांनी दिली. तलवार स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना निमंत्रित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दस-याला सहा वाजता पालखीचे प्रस्थान
दसरा उत्सवातील रमना परिसरातील देवभेट सोहळा मध्यरात्री दिड ते तीन वाजण्याच्या सुमारास होईल.त्यासाठी जेजुरी गडावरून सहा वाजता पालखीचे प्रस्थान
होईल असे राजेंद्र पेशवे यांनी जाहीर केले. दस-याच्या नियोजनासाठी ग्रामस्थ मंडळाची बैठक छत्री मंदीरावर आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी मुख्य विश्वस्त
पोपटराव खोमणे,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे,शशिकांत सेवेकरी, छबन कुदळे,कृष्णा कुदळे,गणेश आगलावे,जयदीप बारभाई,हेमंत सोनवणे,सुधीर
गोडसे,मंगेश घोणे,राजेंद्र खेडेकर, ओंकार झगडे, अनिल झगडे,रामदास माळवदकर,संजय खोमणे,बंटी खान,किरण राऊत आदी प्रमुख मानकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
खंडोबाचे वर्षभरातील वेगवेगळे पारंपारिक पध्दतीने चालत आलेले मान हा ग्रामस्थांचा विषय आहे.विश्वस्त मंडळाने याबाबत काही ठराव करु नये असे यावेळी
ग्रामस्थांच्या सभेत सांगण्यात आले. दसरा उत्वसातील पालखी सोहळ्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.