जेजुरीत भाविकांची मोठी गर्दीलाखांवर भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन
जेजुरी, दि.२८ उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस, मे महिन्यात शेवटचा रविवार असल्याने आज जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात, भंडार खोबऱ्याच्या उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले.
सुगीचे दिवस सुरू होण्यापूर्वीचा तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीतील शेवटचा रविवार , लग्नसराई सुरू असल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली होती. नेहमीप्रमाणे रविवारी होणाऱ्या गर्दीपेक्षा आज भाविकांची मोठी गर्दी जेजुरीत होती. रेल्वे, एस टी बस आणि खासगी वाहनाने भाविक जेजुरीत आले होते. मुख्य महाद्वार मार्ग, जुनी जेजुरी परिसर तसेच ऐतिहासिक चिंच बाग परिसरात भाविक उतरले होते. दुचाकी, चार चाकी वाहनांनी शहरातील सर्व रस्ते जाम झाले होते. दुपार नंतर वाहनांना जेजुरी शहरात प्रवेश करणे शक्य होत नव्हते.
देव दर्शनाला आलेल्या भाविकांकडून ठीक ठिकाणी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले जात होते.
भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीवर मोठा ताण येत होता. आळंदी पंढरपूर महामार्गावर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक वारंवार खोळंबत होती पोलीस प्रशासनाला वाहतुकीचे नियोजन करणे जिकिरीचे बनले होते.