जेजुरीत ‘ बोथ फिमर बॉन फ्रॅक्चर ‘ शस्त्रक्रिया
वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ व गुंतागुंतीची शस्रक्रिया
जेजुरी, दि. २७ एकाचवेळी दोन्ही मांडीतील हाड मोडल्यानंतर करावी लागणाऱ्या शस्त्रक्रियेला बोथ फिमर बोन फ्रॅक्चर असे संबोधले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील ही एक अत्यंत दुर्मिळ तेवढीच गुंतागुंतीची शस्त्र क्रिया असून येथील जेजुरी आयसीयू मल्टी पर्पज हॉस्पिटलमध्ये डॉ.अनिल कदम यांनी यशस्वी केली आहे. ग्रामीण भागात अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन ही होत आहे.
अशा प्रकारच्या या शास्त्रक्रियेबद्दल माहिती देताना डॉ. कदम यांनी ‘ मानवी शरीरात साधारणपणे २०६ हाडे असतात. यात मांडीतील हाड हे सर्वात लांब व दणकट असते. सहजासहजी हे हाड कधीच मोडत नाही. फ्रॅक्चर ही होत नाही. अत्यंत मोठा तीव्र अपघात झाला तरच मांडीतील हाड मोडते. ही घटना एक दुर्मिळ असू शकते. जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील मुख्तार अन्सारी हा कामगार कंपनीत काम करत असताना उंचावरून खाली पडल्याने त्याच्या
दोन्ही मांडीतील हाडे फिमर बोन फ्रॅक्चर झाले होते. अशा परिस्थितीत रुग्ण आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हानात्मक असते. मोठ्या शहरात अद्ययावत अशा ऑपरेशन थिएटर मध्येच ते होऊ शकते. मात्र रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याच्यावर औषधोपचार आम्हालाच करावे लागले. आमच्याकडे ही अद्ययावत उपकरणे असल्याने ते धाडस करू शकलो. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलचे अस्थीरोग तज्ञ डॉ.सचिन नागापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भूलतज्ञ राहुल चौंडकर यांच्यासह ही शस्त्रक्रिया यशस्वी करू शकलो अशी माहिती दिली.
दोन्ही मांडीतील हाड मोडलेले असते अशा प्रुस्थितीत रुग्णाचा साधारणपणे तीन लिटर रक्तस्राव झालेला असतो. दोन्ही मांडीतील हाडांवर शस्रक्रिया करताना जादा रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जीवाला धोका ही निर्माण होऊ शकतो. शस्त्रक्रिया करताना बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. दरम्यान रुग्णाचा रक्तदाब कमी होऊन हृदयाचे काम मंदावू शकते. शस्त्रक्रिया करताना अचानक काहीही गुंतागुंतीची परिस्थिती निर्मान होऊ शकते. मात्र डॉ. अनिल कदम आणि त्यांच्या सहकाऱयांनी रुग्णावर तीन तास ही शस्त्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भाग ही काही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.