जेजुरीत नेहमीच वाहतुकीची प्रचंड कोंडी होते
नागरिकांची बाह्यवळणाची मागणी
जेजुरी, दि २७ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत सतत यात्रा जत्रा उत्सव सुरु असल्याने पुणे पंढरपूर मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. हि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातून जाणारा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रद्द करून बाह्यवळण करावे अशी मागणी सातत्याने जेजुरीकर नागरिक करीत आहेत.
जेजुरी गडावर सध्या चंपाषष्ठी उत्सव सुरु असल्याने दररोज हजारो भाविक तर रविवार दि २७ रोजी लाखभर भाविकांनी गर्दी केली होती. जेजुरीत वर्षाकाठी साधारणपणे १२ यात्रा भरतात.वर्षभरात ५० लाख अधिक भाविक येथे येत असतात. तर दर रविवारी व मार्च ते जून य कालावधीत हजारो भाविकांची जेजुरीत गर्दी असते. या काळात मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. वाहतुकीची कोंडी होते. रस्ता पार करणे देखील अवघड होवून बसते. अशातच आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग शहरातून काढण्याचा घाट घातला आहे.
शहरातून नियोजित महामार्ग तयार केल्यास भाविकांना रस्ता ओलांडणे, तसेच देवकार्यासाठी कऱ्हानदीवर जाणे जिकरीचे होणार आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अनेक दुकानदारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळून उद्योग धंदे उध्वस्त होणार आहेत. विशेष म्हणजे आळंदी पंढरपुर या नियोजित राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक गावात बाह्यवळण केले जात आहे. आणि जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून हि गावातूनच राष्ट्रीय महामार्ग का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जेजुरी शहरातून जाणाऱ्या या नियोजित राष्ट्रीय महामार्गाला जेजुरीकारांचा विरोध असुन राष्ट्रपती पासून ते नगरपालिकेपर्यंत नागरिकांनी निवेदने देवून विरोध केला आहे. इतर गावां प्रमाणे जेजुरी शहराच्या बाहेरून रस्ता करावा, ज्या भाविकांना जेजुरीत देवदर्शनासाठी यायचे आहे त्या भाविकांची वाहने शहरात येतील तसेचमोरगाव, बारामती,नीरा,लोणंद,सातारा कडे जाणारी वाहने बाह्यवळण मार्गाने गेल्यास जेजुरी शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.