जेजुरीत दर्शन एक्सप्रेसला थांबा मिळाल्याबद्दल भंडारा उधळून स्वागत…
जेजुरी, दि.२२ तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवाव्यात अशी जेजुरीकरांची खूप दिवसाची मागणी आहे. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे प्रशासनाने दर्शन साप्ताहिक एक्सप्रेस या दिल्ली -मिरज गाडीला जेजुरी रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा दिल्याचे जाहीर केले होते.रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी जेजुरी स्थानकावर दर्शन एक्सप्रेसचे आगमन झाले तेव्हा फटाके वाजवून व भंडारा उधळून गाडीचे स्वागत करण्यात आले.
रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष विजय खोमणे, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, ऍड पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे , अनिल सौंदाडे, जेजुरी भाजपचे अध्यक्ष सचीन पेशवे, माजी नगरसेवक जयदीप बारभाई, सचिन सोनवणे,गणेश आब नावे ,जालिंदर खोमणे , व स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून गाडीचे स्वागत केले. यावेळी बुंदीचे लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
जेजुरी रेल्वे स्थानकाचा पूर्ण विकास व्हावा यासाठी या परिसरातील स्थानिक नगरसेवक कै. मेहबूब पानसरे,विजय हरिचंद्रे, तानाजी झगडे,गणेश आबनावे हे गेली पाच वर्षापासून प्रयत्न करीत होते, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमधून केंद्र शासनाने सुमारे २० कोटी रुपयांची तरतूद करून येथील रेल्वे स्थानकाचे आधुनिकरण केले आहे, येथे अजून विकास कामे सुरू आहेत.दर्शन एक्सप्रेस दिल्लीहून शुक्रवारी रात्री ९. ४० वाजता निघणार असून शनिवारी रात्री ७ वाजून ४८ मिनिटांनी जेजुरीत येणार आहे, तर मिरज येथे जाऊन तेथून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी निघून जेजुरीत रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी येणार आहे. २२ तासात ही गाडी मुंबई बडोदा रतलाम कोटा मार्गे दिल्लीला पोहोचते. जेजुरीचा खंडोबा साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे,परराज्यातूनही या ठिकाणी भाविक देवदर्शनासाठी येतात या भाविकांना व जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजकांना या दर्शन एक्सप्रेस चा चांगला फायदा होणार आहे.
प्रस्तावित ‘वंदे भारत’ गाडीला जेजुरीत थांबा देण्याची मागणी
रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच वंदे भारत ही रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे .दररोज मुंबईहून कोल्हापूरला ही गाडी जाणार असून खंडोबाला येणारे भाविक ,पर्यटक व उद्योजकांच्या सोईसाठी श्रीक्षेत्र जेजुरी येथे या गाडीला थांबा द्यावा, सर्वच एक्सप्रेस गाड्या येथे थांबवाव्यात अशी मागणी खंडोबा देवस्थान, जेजुरी उद्योजक संघटना (जिमा ) व जेजुरी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.