जेजुरीत जल्लोषात गणरायाला निरोप डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई….
जेजुरी दि ११ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत ढोल ताशे,बंड,व डीजे डॉल्बीच्या तालावर जल्लोष करीत सार्वजनिक गणेश मंडळांनी अतिशय उत्साहात गणरायाला निरोप दिला. जेजुरी शहरातील होळकर तलाव आणि नाझरे धरणावर गणेश भक्तांनी आणि सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाचे विसर्जन केले.
गुरुवार दि ९ रोजी १३ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाचे वाजत गाजत विसर्जन केले. तर अनंत चतुर्थी निमित्त शुक्रवार दि ९ रोजी सकाळ पासूनच घरोघरच्या गणपतींचे विसर्जन सुरु झाले. ऐतिहासिक होळकर तलावा बरोबरच मोठ्या संख्येने नाझरे धरणावर विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य असणाऱ्या उघडा मारुती मित्र मंडळाने दुपारीच वाजत गाजत साध्या पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन केले. मानाचा असणाऱ्या व यावर्षी अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या जननी मित्र मंडळाने ढोल ताशेच्या गजरात शिस्तबद्ध मिरवणूक काढली . प्रथम मानाचा गणपती हनुमान तालीम मंडळ, शेतकरी मित्र मंडळ, विठ्ठलवाडी गणेश मंडळ,अहिल्यादेवी मित्र मंडळ,जयभवानी मित्र मंडळ,अहिल्यादेवी सेवा मंडळ,ताल,दोस्ती,जगदंब,जयहिंद मित्र मंडळ,आदी तेवीस सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे,डॉल्बीच्या तालावर मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन केले. दोन वर्षा नंतर तरुणाई रस्त्यावर थिरकताना पहाण्यास मिळाली.