जेजुरीत जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा खून, दोघे अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

जेजुरी, दि.८ जमिनीच्या वादातून जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक , खा. सुप्रियाताई सुळे यांचे खंदे समर्थक मेहबूबभाई पानसरे यांच्यावर प्राण घातक शस्राने हल्ला करून दहा ते पंधरा वार करून निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. जेजुरी पोलिसांनी आरोपीपैकी दोघांना अटक केली असल्याची माहिती दिली. महिला आरोपी किरण वणेश परदेशी वय ३८ आणि मुलगा स्वामी वणेश परदेशी वय १९ ( दोघेही रा. जेजुरी ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आज आरोपीना सासवड न्यायालयात हजर केले असता त्याना ११ जुलै पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

या बाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत मेहबूबभाई पानसरे यांनी तीन चार वर्षांपूर्वी नाझरे जलशयानजीक गट न २८५ जमीन खरेदी केलेली होती. यावरून परदेशी आणि पानसरे यांच्यात वाद होता. काल दि.७ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परदेशी यांनी जमीनीत ट्रॅक्टर च्या साहाय्याने नांगरणी सुरू केली होती. मेहबूबभाई पानसरे हे पुतण्या राजू फिरोज पानसरे व साजिद युनूस मुलानी यांच्यासह तेथे जाऊन नांगरणी करू नये. कायदेशीर वाद मिटल्यावर जे करायचे ते करा असे म्हणत नांगरणी थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि एक लाल शर्ट घातलेला अनोळखी इसम यांनी बाचाबाची सुरू केली. यातच आरोपी वणेश याने मेहबूबभाई पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. इतर आरोपींनी ही कोयता आणि पहारीने पानसरे यांच्या डोक्यावर मानेवर,पाठीवर दहा ते पंधरा वार केले.
पानसरे सोबत असणाऱ्या दोघांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर ही हल्ला करण्यात आला. मेहबूबभाई पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याने त्यांना जेजुरीतील खासगी रुग्णालयात तेथून पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

जेजुरी पोलिसांनी फिर्यादी राजू पानसरे यांच्या फिर्यादीनुसार वणेश प्रल्हाद परदेशी त्याची पत्नी किरण परदेशी मुलगा स्वामी वणेश परदेशी, चुलता काका परदेशी आणि एक अनोळखी लाल शर्ट घातलेल्या इसमानविरुद्ध भादवी कलमे ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर करीत आहेत.
दरम्यान फिर्यादी नुसार जेजुरी पोलिसांना पाच आरोपीपैकी दोन आरोपीना पकडण्यात यश आले आहे. इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. तीन ही आरोपी लवकरात लवकर सापडतील असे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.
मेहबूबभाई पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. सामाजिक, राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना एक प्रथितयश उद्योजक म्हणून ही ते परिसरात लोकप्रिय होते. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे, व्यपारी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घटनेमुळे जेजुरी शहर व परिसरात मोठी खळबळ व दहशत माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page