जेजुरीत चिंच बाग बचाव आंदोलन…ग्रामस्थांचे एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण.
जेजुरी, दि.१३ ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र जेजुरीतील ऐतिहासिक चिंचबाग वाचवण्यासाठी जेजुरीतील ग्रामस्थांनी माजी नगरसेवक हेमंत सोनवणे आणि मार्तंड देव संस्थान चे विश्वस्त पंकज निकुडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले.
महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जेजुरीत भाविकांच्या कुलधर्म कुळाचारासारखे धार्मिक कार्यक्रम आणि सोयी साठी होळकर तलाव आणि चिंचबागेची निर्मिती केली होती. तेव्हापासून या ठिकाणी राज्यभरातील भाविक जेजुरीत आल्यानंतर याच बागेत वास्तव्य करीत आहेत. याच ठिकाणी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही पार पडत आहेत.
मात्र आचार्य अत्रे प्रतिष्ठाण कडून ही ७ एक्कर १० गुंठे परिसरात असणारी ऐतिहासिक चिंच बाग महाविद्यालय उभारण्यासाठी विकत घेतली. महाविद्यालय उभारताना जेजुरीकरांनी या ठिकाणी महाविद्यालय उभारण्यास मोठा विरोध केला. धार्मिक कार्यक्रम, जागरण गोंधळ आदी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. राज्यभरातून हजारो भाविक याच ठिकाणी येऊन कुलधर्म कुळाचाराचे विधी करीत असतात. ही जागा महाविद्यालयासाठी अनुकूल नसून या ठिकाणी महाविद्यालय उभारू नये. असा आग्रह ग्रामस्थानी यावेळी धरला होता. मात्र ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय कोलते यांनी २० डिसेंबर २००७ रोजी दोन एक्कर जागेत महाविद्यालय उभारू, उर्वरित पाच एक्कर दहा गुंठे जागा भाविकांसाठी व मैदानासाठी खुली ठेवू असे लेखी आश्वासन दिले. तसे पत्र ही जेजुरी नगरपालिकेला देण्यात आले होते. तेव्हापासून ही जागा भाविकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. या ठिकाणी भाविकांच्या जीवावर जागरण गोंधळ करणारे वाघ्या मुरुळी, बकरी कटाई करणारे आदींचे छोटे छोटे व्यवसाय ही सुरू आहेत.
मात्र आता प्रतिष्ठाण कडून या जागेला संरक्षक भिंत बांधून बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेजुरीकरांचा याला प्रचंड विरोध असून अशा प्रकारचे बांधकाम करू नये म्हणून प्रतिष्ठाण कडे विनंती ही करण्यात आली आहे. प्रतिष्ठाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी या बांधकामाला विरोध करण्यासाठी आज एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले आहे.
उपोषणात काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष ईश्वर दरेकर, माजी नगरसेवक भारत शेरे, सुशील राऊत, योगेश जगताप, अतुल सावंत, भाजप शहराध्यक्ष अशोक खोमणे, राहुल दोडके, श्याम दरेकर, सुरेश उबाळे, छबन कुदळे, गणेश जगताप, अलका शिंदे, बायडाबाई शिंदे, सुलोचना मदने, आंबू मोहोरकर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सायंकाळी साडेपाच वाजता जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांनी उपोषण थांबवावे, सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात येईल. याबाबत शासकीय पातळीवरून योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू असे आश्वासन देन्यात आले. आंदोलकांनी सरबत घेऊन उपोषण सोडले.