जेजुरीत गणपती विसर्जन मिरवणुकीत शांततेची परंपरा कायम राखा – उमेश तावसकर, पोलीस निरीक्षक
जेजुरी,दि.६ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या नगरीत गणपती विसर्जन मिरवणुकीत शांततेची परंपरा कायम आहे. कोणतेही गालबोट न लावता जेजुरी शहराचे वैभव जपा. नियमांचे पालन करा . विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेणाचा आवाज आणि मिरवणुकीची वेळ पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले.
श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणूकीच्या निमित्ताने जेजुरी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, उपपोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, कर्मचारी आण्णासाहेब देशमुख, भूषण कदम,माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी विसर्जन मिरवणुकीत बाहेरील नागरिक येवून गोंधळ घालण्याची शक्यता असते. अशा वेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधा. हा उत्सव साजरा करीत असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीची सक्ती करू नका. विसर्जन मिरवणुकी वेळी दिलेल्या वेळेत ,मिरवणूक सुरु करा, रस्ता अडवू नका, ध्वनीक्षेपणाचा आवाज मर्यादित आणि नियमानुसार ठेवा,नागरिकांना,वृद्धाना ,पर्यावरणाला त्रास होईल असे वर्तन करून नका,चौकात व मुख्यमार्गावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, पुणे पंढरपूर मार्गावर वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांशी सौजन्याने वागा . पोलिसांचे सहकार्य मिळेलच मात्र मिरवणुकीत आवजाची मर्यादा आणि वेळ यांचे बंधन न पाळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी हि यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.