जेजुरीतील आय.एस.एम.टी. आणि बर्जर पेंट्स कंपन्यांवर जेजुरी पोलिसांकडून गुन्हे दाखल
जेजुरी, दि.७ गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जेजुरी औद्योगिक वसाहतीतील आय एस एम टी आणि बर्जर पेंट्स या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या अपघाताबाबत जेजुरी पोलिसांनी नुकतेच गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्यावर्षी दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तसेच १६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही आय. एस. एम. टी. या पोलाद कंपनीत लोखंडाचा उकळत्या रसाच्या लँडल चा वायररोप तुटून वरून खाली पडला होता. यातील उकळत्या लोखंडाचा रस अंगावर उडून कंपनीतील ७ कामगार भाजून जखमी झाले होते. कंपनीकडून या कामगारांवर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले होते. मात्र कंपनीकडून याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती कळवली नव्हती. उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटल कडून पोलिसांना देण्यात आलेल्या एम एल सी वरून पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला होता. गुन्हा मात्र दाखल केला नव्हता.
त्यानंतर दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी जेजुरी औद्योगिक वसाहतीतील बर्जर पेंट्स या कंपनीत सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केमिकल बॉयलर चा स्फोट होऊन रोहित जयवंत माने या कामगाराचा ९० टक्के भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे कंपनीला कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कंपनीकडून मृत कामगाराच्या एका नातेवाईकाला कायमस्वरूपी नोकरी व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊन प्रकरण चिघळवू देण्यात आले नाही. यावेळी जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. या दोन्ही कंपन्यांतून अपघात नेमके कसे झाले याचे संबधीत विभागाकडून वस्तुनिष्ठ अवहाल नसल्याने कंपन्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.
या दोन्ही कंपन्यांच्या बाबतीत पुण्याचे अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालाय यांच्या अहवालानुसार आय एस एम टी आणि बर्जर पेंट्स या कंपन्यांच्या व्यवस्थापक व व्यवस्थापनावर मानवी जीवित धोक्यात येईल किंवा नुकसान होण्याची शक्यता असल्याची जाणीव असून ही यंत्रसामुग्री बाबत निष्काळजीपणा करून अपघातास कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे यांनी रीतसर फिर्यादी दिल्या असून पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे करीत आहेत.
दरम्यान, या दोन्ही घटणानंतर लगेचच पुरंदर हवेलीचे आ.संजय जगताप यांनी जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची संघटना जिमा च्या वतीने कंपन्या व्यवस्थापन आणि औद्योगीक विभागाचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेऊन अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून अधिकृत अशा प्रत्येक कंपन्यांतून आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करण्याबाबत कारखानदारांना सूचना दिल्या होत्या. मात्र याबाबत औद्योगिक विभागाकडून रीतसर मान्यता मिळावी म्हणून सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात आ.संजय जगताप यांनी जेजुरी औद्योगिक वसाहतीतील घडलेल्या घटनांचा उल्लेख करीत राज्यभरातील औद्योगिक वासहतीमधून अशा घटना घडू नयेत म्हणून आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात अशी मागणी केली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत अशी चर्चा जेजुरी औद्योगिक वसाहतीत सुरू आहे.