जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थान समितीवरील विश्वस्त निवडीबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी.धार्मिक न्यासामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप….
जेजुरी,दि.२४ महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे गडकोटाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या असून या निवडीमध्ये अनुभवी व सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील सहाजणांच्या निवडी पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केल्यामुळे जेजुरी शहरात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. नवनियुक्त ७ विश्वस्तांपैकी ५ ते६ विश्वस्त हे सत्ताधारी पक्षाचे व संघाचे पदाधिकारी आहेत. ते बाहेरील रहिवासी आहेत. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला आहे.
जेजुरीतील नित्य वारकरी , सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते ,अभ्यासू व्यक्तींना राजकीय हस्तक्षेप होत डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यन्त दुर्दैवी आहे. या निवड प्रक्रियेचा निषेध करतो, याबाबत येत्या दोन दिवसात मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरात ग्रामस्थ बैठकीचे आयोजन करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे.
मागील विश्वस्तांची मुदत डिसेंबर २०२२मध्ये संपल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.त्यानुसार ५००हुन अधिक अर्ज सादर झाले होते पैकी ९५ अर्ज अपात्र ठरविण्यात आले तर ३५० हुन अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या . निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील काळात शहरातील किमान ४ व्यक्ती निवडण्यात याव्यात अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे सहआयुक्त बुक्के यांच्याकडे केली होती. तर मुलाखती वेळी जेजुरी गडाला पायऱ्या किती.? देवांची भूपाळी -आरती येते का? गाभाऱ्यात मूर्ती किती ? जत्रा यात्रा उत्सवांचे महत्व ? देवसंस्थान निगडित अनेक प्रश्न मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना विचारण्यात आले होते. मात्र जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतरत्र रहिवासी असलेल्या ५ व्यक्तींना निवडताना कोणते निकष लावले आहेत ? मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी. म्हणून या निवडीत राजकारण झालेले आहे. हा जेजुरीवासीयांवर अन्याय आहे असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
न्याय व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप होऊन निवडी होणार असतील तर मुलाखती आणि अर्ज मागविण्याचा फार्स करता कशाला ? एकाच राजकीय पक्षाची माणसे निवडली आहेत. राजकीय हस्तक्षेपच करायचा होता तर त्यात स्थानिकांना तरी न्याय द्यायला हवा होता. स्वतःच्या गावातच उपरे व्हावे लागल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटू लागल्या आहेत.
सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे व स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागन्याची ग्रामस्थांकडून तयारी सुरू आहे.
देवसंस्थान विश्वस्त पद हे धार्मिक न्यासावरील सेवेचे पद आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून भाविकभक्तांच्या सोईसुविधेची आणि धार्मिक जत्रा यात्रा उत्सवांचे नियोजन करण्याचे काम असल्याने विश्वस्तांनी “सेवेकरी “म्हणून या जबाबदारीकडे पहावे. स्थानिक विश्वस्त नियुक्त केल्यास पूर्णवेळ देवसंस्थानकडे लक्ष देता येते .मात्र जिल्ह्यातील इतरत्र असलेले प्रतिनिधी नियुक्त झाले की बहुतांश निर्णयाला मर्यादा येतात.
सन.२०१७ ते २०२२या कालावधीकरिता निवड झालेल्या विश्वस्त मंडळात स्थानिक तीन व पुणे जिल्ह्यातील ४ प्रतिनिधी होते.