जेजुरीच्या मल्हार गडावर गणेश स्थापना, घरोघरी बाप्पांचे उत्साहात आगमन
जेजुरी,दि.३१ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीतील मल्हारगडासह घराघरात मंगलमय व धार्मिक वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
बुधवारी(दि.३१)सकाळपासूनच श्रीगणेशमूर्ती ,दुर्वा -हार फुले -फळे ,सजावटीचे साहित्य आदी धार्मिक विधीतील खरेदीसाठी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
ढोल ताशांचा गजर ,सनई चौघड्याचा निनाद आणि गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गजर करीत आबालवृद्ध गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घरी घेऊन जात होते.गेली दोन वर्षांपासून कोरोनाचे निर्बंध होते मात्र यंदा कोणत्याही निर्बंधाविना उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंडेरायाच्या गडकोट आवारातील सदरेमध्ये श्रीगणेश मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी विश्वस्त शिवराज झगडे ,संदीप जगताप,पंकज निकुडेपाटील ,मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, संतोष खोमणे ,व्यवस्थापक सतीश घाडगे,पर्यवेक्षक गणेश डीखळे ,आदींसह कर्मचारी ,पुजारी ,सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेजुरी शहर व पंचक्रोशीमध्ये सुमारे तीन हजारांहून अधिक घरांमध्ये लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्याचे समजते.