जेजुरीचे सांस्कृतिक भवन पाडण्याचे काम सुरू, मनसेचा विरोध. बहुद्देशीय सभागृह दुसऱ्या जागेत उभारण्याचे आश्वासन. कामाला हिरवा कंदील..
जेजुरी , दि ३ जेजुरी नगरपालिकेच्या मालकीचे सांस्कृतिक भवन पाडून त्याजागेत अत्याधुनिक नाट्यगृह बांधण्यात येणार आहे . हे सांस्कृतिक भवन सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी पाडू नये अशी पुरंदर मनसे,भाजपा व नागरिकांनी करून नाट्यगृहाला विरोध केला होता .शहरातील इतर जागेत जनतेसाठी बहुद्देशीय सभागृह लवकरच उभारले जाणार असल्याचे आश्वासन पुरंदरचे आमदार संजय जगताप, जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी दिल्याने नाट्यगृहाच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे .
जेजुरी नगरपालिकेच्या जागेत सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते . या जागेत शासनाच्या सुमारे चार कोटी पंचवीस लक्ष रुपये खर्चून आधुनिक पद्धतीचे नाट्यगृह उभारले जात आहे, यासाठीची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे . हे सांस्कृतिक भवन पडल्यास सर्वसामान्य नागरिकांना लग्नकार्य,साखरपुडा,विविध छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी कोठेही सभागृह उपलब्ध नसल्याने मनसे, भाजपा व नागरिकांनी विरोध केला होता . तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी हे सांस्कृतिक भवन पाडण्यास सुरुवात झाली यावेळी पुरंदर मनसेचे अध्यक्ष उमेश जगताप यांनी याला विरोध केला . बहुद्देशीय कार्यलय प्रथम उभारावे अशी मागणी केली .
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी लवकरच जेजुरी पालिकेच्या इतर जागेत सुसज्ज सांस्कृतिक भवन उभारले जाईल असे आश्वासन दिले . या निर्णयाचे मनसेचे उमेश जगताप यांनी स्वागत करून आमदार संजय जगताप व मुख्याधिकारी इंगोले यांचे आभार मानले .