जेजुरीचा मर्दानी दसरा… तब्बल १८ तास रंगला…

जेजुरीत रंगला तब्बल १८ तास मर्दानी दसरा..

जेजुरी,दि.६ ( प्रतिनिधी ) धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत मर्दानी दसरा काल बुधवारी मोठ्या उत्साहात तब्बल १८तास रंगला. या मर्दानी सोहळ्यात हजारो भाविक भक्त ,ग्रामस्थांना वेगळीच अनुभूती देऊन गेला. यावेळी उपस्थित भाविकांनी मुक्त हस्ते भंडा-याची उधळण केल्याने गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुरुवारी(दि.६) ऐतिहासिक खंडा स्पर्धेने सोहळ्याची सांगता झाली.

नवरात्र उत्सवाची सांगता आणि घराघरातील घट उठवणे ,तळीभंडार-शस्त्रपूजन झाल्यानंतर जेजुरीकर ग्रामस्थ ,मानकरी,पुजारी सेवेकरी,खांदेकरी तसेच सोहळ्यामध्ये सहभागी होंण्यासाठी जेजुरीचा गड व परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.सायंकाळी ६ वाजता मानकरी राजेंद्र पेशवे ,सचिन पेशवे ,माळवदकर पाटील,खोमणे पाटील यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याने सीमोल्लंघन,भेटाभेट आपटापूजन व नगरप्रदक्षणेसाठी गडकोट आवारातून प्रस्थांन ठेवले. यावेळी भाविक भक्तांनी भंडा-याची उधळण केली. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात घडशी समाजबांधव यांच्या सनई चौघड्याच्या मंगलमय वाद्यांत पालखी बालद्वारी येथे आणण्यात आल्यानंतर पुजारी सेवेकरी यांच्या हस्ते भांडारगृहातून श्रींच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या आणि फटाक्यांची आतषबाजीमध्ये
पालखी सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले. यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. रात्री७;३० वाजता पालखी सोहळा गडकोटामागील टेकडीवर स्थिरावला . दरम्यान रात्री ९ते१०च्या सुमारास मार्तंड भैरवाचे मूळ स्थान कडेपठार येथील पालखी सोहळा भेटाभेट सोहळ्यासाठी निघाला दोन्ही मंदिरांमध्ये जयाद्रीची डोंगररांग असल्याने पूर्ण डोंगररांगेत दोन्ही मंदिर व्यवस्थापणाकडून विजेची सोय करण्यात आली होती.
रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुसरटिंगी टेकडी व डीखळे भालेराव बंधूनी रोवलेल्या आपट्याला कडेपठारच्या राजाने स्पर्श करताच समस्त ग्रामस्थ मानकरी यांनी शिलांगणाचे सोने लुटले तर माळी बांधवांनी आपट्याचे झाड उपटले. यानंतर मल्हार गडाचा पालखी सोहळा जयाद्री डोंगर दरीत व कडेपठार पालखी सोहळा जयाद्रीच्या कड्यावर अशा दोन्ही पालख्यांचा भेटाभेट सोहळा सुमारे १तास रंगला यावेळी जेजुरी गडाचा पालखी सोहळा डोंगर दरीत असतो तर कडेपाठरचा सोहळा
उंच डोंगर कड्यावर असतो दोन्ही पालख्यांची भेट मध्यरात्रीच्या सुमारास आरशातून व फटाक्यांच्या आतषबाजीत होते या धार्मिक विधींमध्ये नाभिक बांधव “राऊत ” व परिटबांधव “राऊत “”यांना मान आहे वर्षातून एकदाच ही भेट होत असल्याने याला धार्मिक महत्व आहेच. यावेळी देवसंस्थान ग्रामस्थांकडून फटाक्यांची मनमोहक आकर्षक प्रचंड आतषबाजी करण्यात आली.आणि कडेपठार चा सोहळा परतीच्या मार्गी लागला तर ,मल्हार गडाचा पालखी सोहळा नगरप्रदक्षनेसाठी मार्गस्थ झाला ..रमना परिसरातील आपटापूजन सोने लुटून रोकडोबा मंदिराला मान देत नगरपालिका चौकातील रावणदहन, जामा मस्जिद समोर मुस्लिम बांधव पानसरे परिवाराचा पानांचा विडा घेत, मुख्य महाद्वार मार्गे पालखी सोहळा गुरुवारी (दि.६)सकाळी ७ वाजता गडकोट आवारात दाखल झाला ,महाद्वार मार्गात ग्रामस्थांकडून भुईनळे यांची आतषबाजी ,धनगर बांधवाकडून लोकरीची उधळण करीत लोकगीते गात सुंभरान मांडण्यात आले.गडावर पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर लोककलावतांकडून श्रींसमोर लोकगीते गात हजेरी लावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page