जेजुरीचा मर्दानी दसरा उत्सवमूर्तींचा पालखी सोहळ्या चे सीमोल्लंघणासाठी प्रस्थान..
जेजुरी, दि.५ ( प्रतिनिधी )
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी येथील मर्दानी दसरा उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मुख्य मंदिरातील उत्सवमूर्तींना पुजारी सेवेकाऱ्यांनी पालखीत ठेवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सदानंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार च्या जयघोषात आणि भंडाऱ्याच्या मुक्तहस्ताने उधळण करीत खांदेकऱ्यानी उत्सवमूर्तींची पालखी उचलली. भांडाऱ्याची उधळण आणि देवाच्या जयघोषात सोहळा कडकोटाबाहेर पडला. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली.
जेजुरीचा दसरा उत्सव ग्रामस्थांचा असल्याने संपूर्ण गाव जेजुरीगडावर एकवटला होता. सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा गडकोटाच्या मागील बाजूस टेकडीवर विसावला.
यावेळी मार्तंड देवसंस्थांनचे विश्वस्त, पालखीचे मानकरी, सेवेकरी खांदेकरी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मर्दानी दसरा सोहळा रात्रभर जयाद्रीच्या पर्वत रांगांमध्ये साजरा होत असतो. रमना परिसरात रात्रभर फटाके आणि शोभेच्या दारुगोळ्याची आतिषबाजी होत असते. राज्यभरातून असंख्य भाविक मर्दानी दसरा उत्सव पाहण्यासाठी जेजुरीत येत असतात.