जुनीजेजुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्लबचे सिलिंग कोसळले, सुदैवाने अनुचित घटना नाही.
जेजुरी, दि ५ जुनीजेजुरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारती मधील एका वर्गातील स्लबचे सिलिंग खाली कोसळले . दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने कोणीही विद्यार्थी वर्गात नव्हते त्यामुळे सुदैवाने या घटनेत विद्यार्थी वाचले आहेत. हि घटना शुक्रवार दि ३ रोजी घडली आहे.
जुनी जेजुरी येथील दत्तमंदिराच्या परिसरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत १३१ विद्यार्थी शिक्षण घेतात. एकूण वर्ग खोल्यांपैकी एक आरसीसी बांधकामाची खोली तर उर्वरित पत्र्याच्या खोल्या आहेत .आरसीसी खोलीचे बांधकाम १९९५ साली झाले आहे.
शुक्रवार दि ३ रोजी दुपारी जेवणासाठी सुट्टी झाल्या नंतर या वर्गातील विद्यार्थी जेवणासाठी शाळेच्या आवारात बसले. यावेळी अचानक आरसीसी बांधकाम असणाऱ्या खोलीतील स्लबचे सिलिंग कोसळले . सिलिंगचे तुकडे विद्यार्थ्यांच्या बेंचवर व खोलीत पडले . त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी घाबरून गेले. वर्गात मुले नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाने केंद्र प्रमुख तसेच पंचायत समिती शिक्षण विभागाला या संदर्भात माहिती दिली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन डी जगताप यांनी तातडीने शाळेला भेट देवून माहिती घेतली. जुनीजेजुरी येथील नागरिकांनी लोकसहभागातून हि शाळा सुरु केली आहे. शाळेत विद्यार्थी संख्या मोठी असून शैक्षणिक दर्जाही चांगला आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून ती धोकादायक झाली आहे , जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देवून तातडीने इमारतीची दुरुस्ती कारवाई अशी मागणी केली आहे.