जिल्ह्यातील सर्वच शाळेतील वर्गात दिसणार शिक्षकांचे फोटो… ‘आपले गुरुजी’ या नावाने शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना….फोटो लावण्याने गुणवत्ता कशी वाढणार? गुरुजनांचा सवाल
जेजुरी दि. ३० ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात ‘आपले गुरुजी’ या नावाने शाळेमध्ये वर्गाच्या दर्शनी भागात संबंधित शिक्षकांचे फोटो सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याबाबत चर्चा झाली असून दोन आठवड्यात याबाबतची अंमलबजावणी करण्याच्या सुचना शालेय शिक्षण सचिवांनी दिल्या आहेत.
त्यानुसार पुणे जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या,सर्व माध्यमांच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्गशिक्षकांचे फोटो लावावेत अशा लेखी सूचना शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिल्या आहेत.
शिक्षकांचे फोटो वर्गामध्ये लावून गुणवत्ता कशी वाढणार ?
“राज्यात तोतया शिक्षक असतील किंवा स्वतः शाळेतच न येणे असे काही प्रकार मोजक्या शाळेतून घडले असतील म्हणून सर्वच शिक्षकांना बदनाम करु नये.
तोतया शिक्षक ठेवले असतील तर मूळ शिक्षकांना कायमचे घरी पाठवले पाहिजे.पगारपत्रकावरील आणि तोतया शिक्षक अशा दोघांवरही फसवणूक आणि अपहाराचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. जेलमधे टाकले पाहिजे. इतकं गंभीर चित्र असेल तर आतापर्यंत कारवाई का नाही झाली? त्या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा इतकी वर्षे काय झोपा काढत आहे का? या गुन्ह्यात त्यांचाही सहभाग गृहीत धरून कारवाई झाली पाहिजे.” -विजय कोंबे
राज्य सरचिटणीस
“वर्गात शिक्षकाचा फोटो लावून काय साध्य करणार आहात?कशाला हवेत वर्गात शिक्षकांचे फोटो ? स्वतःचा फोटो लावून सन्मान कसा वाढणार आहे? वर्गात शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रियेतून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया घडते.त्यातून जिव्हाळा,आपलेपणा वाढतो.फोटो लावून नाही.”- महादेवराव माळवदकर पाटील
राज्य संपर्क प्रमुख
शिक्षक समिती
“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीआई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महामानवांच्या शेजारी भिंतीवर जिवंत शिक्षकांना तसबिरीत लटकवणे योग्य नव्हे.”
-नंदकुमार होळकर
पुणे जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती.
“आज पर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चातच भिंतीवर फोटो लावण्याची प्रथा परंपरा आहे.त्यामुळे जिवंत शिक्षकांचे फोटो भिंतीवर लावणे हा ऐतिहासिक निर्णय ठरेल.”
संदीप कदम
अध्यक्ष पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ
शिक्षण सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दिलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी असे सांगितले आहे.मात्र शिक्षण सचिवांनी लेखी आदेश (जी.आर.परिपत्रक) का दिले नाहीत?
याबाबत देखील शिक्षणक्षेत्रात चर्चा सुरु आहे.
त्यामुळे राज्यभरातून या अनाकलनीय व अतार्किक निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये रोष असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात जिवंत शिक्षकांचे फोटो पाहायला मिळणार की नाही?
याबाबत साशंकता आहे.