जिल्ह्यातील सर्वच शाळेतील वर्गात दिसणार शिक्षकांचे फोटो…
‘आपले गुरुजी’ या नावाने शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना….
जेजुरी, दि. २७ महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात ‘आपले गुरुजी’ या नावाने शाळेमध्ये वर्गाच्या दर्शनी भागात संबंधित शिक्षकांचे फोटो सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याबाबत चर्चा झाली असून दोन आठवड्यात याबाबतची अंमलबजावणी करण्याच्या सुचना शालेय शिक्षण सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात देखील अंमलबजावणी करावी अशा सूचना शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार पुणे जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या,सर्व माध्यमांच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्गशिक्षक व वर्गशिक्षिका यांचे फोटो ‘आपले गुरुजी’ या नावाने सन्मानपूर्वक वर्गाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा.
याबाबत सर्व शाळांमध्ये या सुचनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे यापुढे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वर्गाच्या दर्शनी भागात आपापल्या वर्ग शिक्षकांचे फोटो पाहायला मिळणार आहेत.सदरचा फोटो किमान A4 आकाराचा व रंगीत असावा. शिक्षकाचे नाव व फोटो या व्यतिरिक्त शिक्षकांबद्दल कोणतीही माहिती नसावी. अशा सूचना दिल्या आहेत.