जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ….. आंतरजिल्हा बदली शिक्षकांना मनस्ताप..

शाळांवर हजर झालेल्या शिक्षकांची पदस्थापना रद्द….
पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अशी वेळ
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची ससेहोलपट

पुणे, दि.३ (प्रतिनिधी)
ग्रामविकास विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांचीआंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पार पडली. त्यानुसार अन्य जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये ३२ शिक्षक हजर झाले. त्या संबंधित शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेने (२९ सप्टेंबर) रात्री ९:३० वा.समुपदेश पध्दतीने जिल्ह्यातील दुर्गम भागात पसंतीक्रमानुसार नियुक्ती आदेश दिले.
पुणे जिल्हा परिषदेने दिलेल्या आदेशानुसार संबंधित शिक्षक तत्काळ (३० सप्टेंबर) रोजी शोधाशोध करीत दिलेल्या शाळांवर हजर देखील झाले.
मात्र शाळा सुटल्यावर घरी येईपर्यंत पदस्थापना रद्द झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी व संबंधित शिक्षकांना कळवण्यास सांगितले.
संबंधित शिक्षकांना पदस्थापना देत असताना अवघड क्षेत्रातील शाळांपैकी रिक्त असणाऱ्या शाळांवर पदस्थापना देण्यात आलेली नाही. नियमाचे पालन झालेले नाही.त्यामुळे (२९ सप्टेंबर) रोजी जिल्हा परिषदेने राबवलेली समुपदेशन प्रक्रिया व दिलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत. असे लेखी आदेश दिले.
त्यामुळे पंचायत समिती व शाळांवर हजर झालेल्या सर्व शिक्षकांनी सोमवार (३ ऑक्टोबर) रोजी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे येथे उपस्थित रहावे.
असे लेखी आदेश दिल्यामुळे शिक्षण विभागाचा समन्वयाच्या अभाव व सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
शाळांवर हजर झालेल्या शिक्षकांना पुन्हा जिल्हा परिषदेला बोलावून पदस्थापना देणार अशी वेळ जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. त्यामुळे हजर झालेल्या शिक्षकांना फेर समुपदेशन घेऊन फेरआदेश दिले जातील.यामध्ये शिक्षकांची ससेहोलपट होणार आहे जिल्हा परिषदेच्या समन्वया अभावी शिक्षकांना विनाकारण त्रास झाल्याची शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा आहे. जिल्हा परिषदेने शिक्षकांना वेठीस धरून नक्की काय साध्य केले ?हा चर्चेचा विषय असून महिला शिक्षकांमध्ये असंतोष असून संताप व्यक्त करीत आहेत.

या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी
सन २०२२ च्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये बदल्या ह्या २०१९ च्या अवघड क्षेत्रानुसारच होणार आहेत परंतु आता बदली घेऊन ज्या शाळेवर शिक्षकांना जायचे आहे ती शाळा कोणत्या क्षेत्रात आहे हे समजण्यासाठी २०२२ च्या अवघड क्षेत्राची यादी वापरणे आवश्यक आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या ३२ शिक्षकांना समुपदेशन देताना तालुक्यांना २०२२ च्या अवघड क्षेत्राप्रमाणे रिक्त पदांच्या शाळांच्या याद्या मागितल्या होत्या. परंतु एका तालुक्याकडून नजरचुकीने २०२२ च्या ऐवजी २०१९ च्या अवघड क्षेत्राच्या यादीप्रमाणे रिक्त शाळांची यादी देण्यात आली. त्यामुळे २०१९ मध्ये अवघड क्षेत्रात असलेल्या शाळा ज्या २०२२ च्या सोप्या क्षेत्रात घोषित झालेल्या आहेत अशा शाळांवर काही शिक्षकांना नियुक्ती दिली गेली. शुक्रवार दिनांक ३०/०९/२०२२ रोजी सर्व शिक्षकांना फक्त तालुक्यात रुजू होण्यास कळविले होते आणि शनिवार दिनांक ०१/१०/२०२२ रोजी शाळेवर रुजू होण्याबाबत कळविले होते. परंतु शुक्रवारीच आदेश निर्गमित करून समुपदेशन प्रक्रिया रद्द केल्याचे कळविले आहे. त्यामुळे कोणीही शिक्षक शाळेवर रुजू झालेले नाहीत.
२०२२ पासून समुपदेशनाने बदली घेणाऱ्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात तीन वर्षे केल्यानंतर बदलीचा लाभ मिळावा यासाठी २०२२ ची अवघड क्षेत्राची यादीच ग्राह्य धरली जाणार असल्याने जर २०२२ मध्ये सोप्या क्षेत्रातील शाळांवर त्यांना पदस्थापना दिली गेली तर तीन वर्षानंतर त्यांना बदलीसाठी अधिकार प्राप्त गृहीत धरता येणार नाही व त्यांची तीन वर्षानंतर सोप्या क्षेत्रात बदली होऊ शकणार नाही.त्यांचे बाबत हा अन्याय होऊ नये म्हणून ही समुपदेशन प्रक्रिया रद्द करून नव्याने समुपदेशन प्रक्रिया राबविली जात आहे.

शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी मात्र ही घोड चूक करणाऱ्या तालुक्याचे नाव व तेथील गट शिक्षणाधिकारी कोण हे मात्र सांगितले नाही. जिल्हा प्रशासनाने अशी अक्षम्य चूक करून शिक्षकांना मनस्ताप देणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page