जिजामाता विद्यालयात विद्यार्थ्यांनी दिले शिक्षणाचे धडे ( शिक्षक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम )
जेजुरी, दि.१२
शिक्षक दिनाचे औचित्य साधत जेजुरीतील जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज विद्यार्थीच शिक्षक बनले होते, मोठ्या वर्गातील मुलांनी छोट्या वर्गावर जाऊन तास घेऊन आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त केला.
विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या संकल्पनेतून आज विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्गावर जात तास घेऊन विविध विषयांचे धडे गिरवले.
भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षकाप्रती आदर व्यक्त करणे हाच या मागचा मुख्य हेतू असून येथील जिजामाता विद्यालयाने विद्यार्थ्यांना शिक्षक बनून शिक्षण कसे दिले जाते याचे अनुभव दिले.
यावेळी सर्व गुरुजनांचा गौरव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे विश्वस्त रविंद्र ( बाळासाहेब) पारखे,माजी प्राचार्य डॉ.नारायण टाक, दैनिक लोकमतचे पत्रकार बी.एम.काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब पारखे, प्राचार्य नंदकुमार सागर, पत्रकार बी एम काळे, माजी प्राचार्य डॉ.नारायण टाक यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले, आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ.नारायण टाक म्हणाले की शाळांमधील वातावरण विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वासी मिळते जुळते असणारे असावे, विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे, चैतन्यमय, अभिव्यक्तीचा आदर करणारे ,त्याचप्रमाणे जिज्ञासा जागृत करून ,शंका विचारण्याचे स्वातंत्र्य देणारे असावे तसेच ते पुढे म्हणाले की शिक्षक हा मातृ हृदयी असायला हवा, लहान मूल घडवणे त्याच्यावर संस्कार करून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला सुयोग आकार देणे हे काम मातृ हृदयाची व्यक्तीच करू शकते.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी नम्रता मंगेश कापरे ही एक दिवसाकरीता मुख्याध्यापक बनली होती.इयत्ता दहावीतील गौरी कुदळे व राधिका बयास यांनी मराठी विषय ,हिंदी विषय कस्तुरी भुजबळ,समीर माने,इंग्रजी विषय देवकर अनुष्का , मयूर पवार ,गणित विषय पवार सिध्दी व पार्थ देशमुख, विज्ञान विषय पायल पाटील , शारदा चव्हाण,इतिहास विषय नेहा काकडे तर भूगोल विषय प्रियांका राजपुरे व गायत्री गवळी या विद्यार्थ्यांनी शिकविले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे,प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे,पर्यवेक्षिका लीना पायगुडे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप, ज्युनिअर विभाग प्रमुख किरण मोडक, वर्षा देसाई, सोमनाथ उबाळे, सागर चव्हाण तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक छाया पोटे,कैलास सोनवणे,महेश खाडे यांनी केले.