जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण सुरू….छत्रपती संभाजी राजेंनी घेतली भेट, राजांचा मान राखीत जरांगे पाटीलानी पाणी ही पिले….
जालना, दि.२५ ( प्रतिनिधी ) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. आज त्या कालावधीची मुदत पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीमध्ये येऊन संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. आपण मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
महाराजांचे वंशज शाहू महाराज यांनी 1902 मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिलं. यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय. महाराजांनी वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य स्थापन केलं. पण गरीब मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. सगळ्यांना ऐक करण्यासाठी मी सुद्धा फिरतोय. मी सुद्धा आमरण उपोषण केलं आहे. आमचं कर्तव्य आहे, जो लढतोय त्याच्या मागे पाठबळ उभे करावे. मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे.
दरम्यान यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती भावूक झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. ‘मनोजने पाणी तरी घ्यावं’ असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. दरम्यान जरांगे पाटील यांनी देखील संभाजीराजे यांच्या विनंतीला मान देत पाणी पिलं. आजचाच दिवस पाणी घेणार ते पण संभाजीराजेंचा मान ठेवून फक्त असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे