जननी मंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी केले तबलावादन
जेजुरी, दि.७ जेजुरी शहरातील मानाचा गणपती असणारा जननी मित्र मंडळ यावर्षी अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असून या निमित्ताने मेघमल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने ७५ बाल तबलावादकांनी नादब्रम्ह हा नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणला.या नादब्रम्ह तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
जेजुरी येथील जननी मित्र मंडळाचे यंदा ७५ वे वर्ष असून त्याच बरोबर देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार दि ५ रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय गोडसे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली व त्यांच्या हस्ते नादब्रम्ह या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
जेजुरी येथील मेघमल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत विशारद अमोल बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ बाल तबलावादकांनी नादब्रम्ह हा कार्यक्रम सादर केला. तबला वादनात राम कृष्ण हरी त्रिताल,गणपती स्तुती परन आदी तालावर तबलावादन करण्यात आले. संगीत विशारद श्रीकांत जाधव, बासरीवादक आनंद कोळसुने यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. लहान मुलांनी केलेल्या या तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
जननी मित्र मंडळाच्या वतीने आजपर्यंत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.डीजे,डॉल्बीला फाटा देत वृक्षारोपण ,शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम राबविले जात असल्याचे उत्सव प्रमुख सतीश घाडगे यांनी सांगितले.