चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावर तेल हंडा ..
जेजुरी, दि २८ महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव अतिशय धार्मिक वातावणात जेजुरी गडावर सुरु असून सोमवार दि २८ रोजी मार्गशीर्ष पंचमीला पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत सायंकाळी गडावरून तेल हंडा काढून मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्री खंडोबा व म्हाळसा देवीला तेलवण करून हळद लावण्यात आली आहे.
मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरवात झाली .आज मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते त्या निमित्ताने आज सायंकाळी साडे सहा वाजता जेजुरी गडावरून गुरव,कोळी,वीर घडशी या पुजारी सेवक वर्गाच्या वतीने पारंपारिक पध्दतीने तेलहंडा काढण्यात आला.मंदिरा समोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली. कोळी समाजाचे वैभव लांघी यानी तेल हंडा डोक्यावर घेवून घडशी समाजाच्या वतीने सनई चौघडा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी पुजारी सेवक वर्गाचे गणेश आगलावे, व संतोष लांघी, विठ्ठल लांघी, बापू लांघी,मुन्ना बारभाई,संजय आगलावे,अविनाश सातभाई, सतीश कदम, सुधाकर मोरे ,निलेश मोरे,मयूर मोरे, प्रवीण मोरे, गणेश मोरे, आयुष मोरे, शार्दुल मोरे,रोहन लांघी, दिनेश बारभाई, देवसंस्थानचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जेजुरी गडावरून वाजत गाजत तेल हंडा गावाच्या चावडीत आणण्यात आला.चावडीत गावातील सर्व मानकऱ्यांचे नाव पुकारून हंड्यात तेल अर्पण करण्यात आले. गडाच्या पायथ्याशी मानकर्यांनी तेल व बाण अर्पण केल्या नंतर तेल हंडा गडावर नेह्ण्यात आला. शेजारतीला मानकरी व भाविकांनी अर्पण केलल्या तेलाने देवाला अंघोळ घालण्यात आली. व श्री खंडोबा व म्हाळसा देवाला हळद लावण्यात आली.
जेजुरी गडावर वातावरण मल्हारमय होवून गेले आहे. जेजुरी गडावर चंपाषष्ठीला हळद व पौष पौर्णिमेला पाल येथे देवाचे लग्न होते. मंगळावर २९ रोजी चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार असून मंदिरातील व घरोघरी बसवलेले देवाचे घट उठवून देवाला पुरणपोळी व वांगे भरीत व रोडगा अर्पण करून तळीभांडाराचा कुलधर्म कुलाचार करून उपासनेची सांगता होणार आहे.