गेल्या ३५ वर्षांपासून काम करतोय, अजूनही निराशाचखा. सुप्रिया सुळेंसमोर सफाई कामगारांचा आक्रोश…

जेजुरी, दि. ६ गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही जेजुरी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून आम्ही काम करतोय, मात्र अजूनही आम्हाला कायम केले नाही. उलट बाहेरचे कायम कामगार इथे पाठवून आमच्या रोजगारावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय आम्ही अजून किती दिबस सोसायचा असा आक्रोश जेजुरी नगरपालिकेतील सफाई कामगारांनी खा.सुप्रिया सुळे आणि पुरंदर हवेलीचे आ
संजय जगताप यांच्यासमोर व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा. सुप्रिया सुळे आणि पुरंदर हवेलीचे आ.संजय जगताप यांचा आज पुरंदर दौरा आयोजित करण्यात आला. याच दौऱ्यात जेजुरीतील स्वच्छता कर्मचार्यांशी त्यांनी संवाद साधला.त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली.
जेजुरी नगरपालिकेत एकूण १२५ कंत्राटी सफाई कामगार आहेत. यातही चाळीसगाव नगरपालिकेतील १५ सफाई कामगारांना बदलीवर जेजुरी पालिकेकडे वर्ग करण्यात आलेले आहे. जेजुरीतील स्थानिक १४ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश असताना शासनाने त्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांची येथे बदली करून स्थानिकांवर अन्याय करण्यात आला आहे. आम्ही आयुष्यातील ३५ वर्षे सफाई कर्मचारी म्हणून काम करीत असून आमच्यातील कोणीही आजपर्यंत कायम करण्यात आलेले नाहीत. आजही आम्हाला कंत्राटी कामगार म्हणूनच काम करावे लागत आहे. याशिवाय गेल्या चार महिन्यांपासून आम्हाला पगार ही मिळालेला नाही. येणाऱ्या सणासुदीला आम्ही नेमके करायचं काय ? आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.
खा.सुळे यांनी जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन थेट नगर विकास मंत्रालय सचिवांशी संपर्क साधला. जेजुरी पालिकेतील पालिकेचे प्रस्ताव व मागण्या लवकरात लवकर मान्य करून तसे आदेश करावेत अशा सूचना दिल्या. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नात आ संजय जगताप आणि आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी त्यांनी जेजुरी बस स्थानक आणि जेजुरी गडावर सुरू असलेल्या विकास कामांची ही पाहणी केली.
जेजुरी एस टी बसस्थानक हे येत्या वर्षभरात अद्ययावत बसस्थानक होणार आहे. जेजुरी गडाच्या सुमारे साडे तीनशे रुपयांच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील १०९ कोटींचे काम सद्या सुरू आहे. याच बरोबर जेजुरीचे बस स्थानक ही सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्चून सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांसह अद्ययावत होत आहे. निविदा निघाल्या आहेत काम ही लवकरच सुरू होणार असल्याचे आ.संजय जगताप यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जेष्ठ नेते सुदाम इंगळे, तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, दत्ताजी चव्हाण, जयदीप बारभाई, एन डी जगताप, बबूसाहेब माहुरकर, तसेच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, गणेश जगताप अजिंक्य जगताप, महेश दरेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page